साहेबराव दातीर यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

सिडको : प्रतिनिधी
प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर यांच्यावर शनिवारी (दि. 15) रात्री दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी दातीर यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून त्यांना दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत दातीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दातीर हे 15 ऑगस्टच्या रात्री विल्होळी येथून चारचाकीने नाशिकच्या दिशेने जात होते. त्यावेळी दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आणि दातीर यांच्यावर दांडक्याने हल्ला करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दातीर हे गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करीत आहेत. तसेच एमआयडीसी परिसरातील अतिक्रमण आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधातही त्यांनी अनेकदा भूमिका मांडली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरच हल्ला झाला आहे का, याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम वाडीवर्‍हे पोलिसांकडून सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अंबड परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Sahebrao Datir attacked by unknown persons.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *