ट्रॅक्टरवरून पूरग्रस्त भागात पोहोचले मुख्य कार्यकारी अधिकारी

पुराच्या विळख्यातील चांदोरी-सायखेड्यात मदतकार्याला वेग

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात 23 व 24 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा येथील पूरस्थितीची मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि अपर पोलीस अधीक्षक निलोत्मा राव यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला
सर्वोच्च प्राधान्य देत मदत, बचाव व पुनर्वसनाच्या उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित
यंत्रणांना दिल्या.
पूरग्रस्त भागात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी ट्रॅक्टरवरून पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली. नदीकाठच्या व बाधित वस्त्यांची पाहणी करून प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. यानंतर सर्व विभागप्रमुख, आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच संबंधित अधिकार्‍यांची आढावा
बैठक घेतली.
बैठकीत पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. स्थलांतरित नागरिकांना तात्पुरता निवारा, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, अन्नधान्य व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य, पोलीस आणि इतर सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळावी, असेही सांगण्यात आले. चांदोरी ग्रामपंचायतीमार्फत सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या निवासासह आवश्यक सुविधांची पाहणी केली.
चांदोरी येथे सुमारे 400 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून, सुमारे 100 दुकाने पुरामुळे प्रभावित झाली आहेत.सायखेडा येथे 250 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. सुमारे 125 दुकानांमधील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही गावांमिळून 650 कुटुंबाचे स्थलांतर केले. संबंधित यंत्रणांकडून पंचनामे व नुकसानाचे सर्वेक्षण सुरू असून, आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. यावेळी गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील, चांदोरीचे सरपंच विनायक खरात, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Executive Officer reached flood-affected areas on a tractor.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *