पाऊस पृथ्वीचा सखा…

सविता दिवटे-चव्हाण

उन्हाळ्यातल्या तप्त उन्हाने पृथ्वीला तडे पडतात. संपूर्ण सृष्टी तहानलेली होऊन जाते…आणि एखादं दिवशी अचानक पृथ्वीचा सखा वरुणराजाचे आगमन होते. पावसाच्या येण्याने सृष्टीचे रूप पालटते.
वातावरणात नवचैतन्य पसरते.
वृक्षवेली बहरतात. डोंगर पावसाने न्हाऊन निघतात. नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागतात. चिंब चिंब पावसात पशू-पक्षीही भिजतात. सर्वत्र हिरवाई पसरू लागते.धरणीमाता तृप्त होऊन हिरवा शालू पांघरते.
पाऊस पृथ्वीचा खरा सखा…तो येतो अनेक सुखद गोष्टी घेऊन. आकाशात इंद्रधनुष्याचे प्रागट्य होते. मनाला मोहून जाते. रिमझिम पाऊस गारवा देतो तण आणि मनालाही. निसर्ग नव्या रूपात पाहायला मिळतो. खळखळणारे निर्झर आणि धबधबे साद घालतात. डोंगर हिरवाईने नटतात. सृष्टी ताजीतवानी होते.
मुख्य म्हणजे बळीराजा सुखावतो.शेतीच्या कामांची लगबग सुरू होते.सर्जा-राजाला सोबतीला घेऊन तो आनंदाने कामाला लागतो. पावसावर खरं तर त्याचे स्वप्न आकार घेत असते. मनात एक नवी उमेद घेऊन तो उभा राहतो.
पावसाच्या थेंबात अमृत भरलेले असते. तो थेब शिंपल्यात जाऊन मोती बनतो. शेतात जाऊन सोन्यासारखी पिकं उभी करतो. पशुपक्षी, वृक्षवेली, गुरेढोरे, मनुष्यप्राणी आणि निसर्गाला नवसंजीवनी बहाल करतो…मनाला आठवणीच्या राज्यात घेऊन जातो. म्हणूनच आपण सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहतो..तो पृथ्वीचा खरा सखा..तो पाठीराखा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *