नाशिक

नाशिकरोडला एकाच टोळीचा दोन ठिकाणी धुमाकूळ

पिस्तूल-चॉपरचा धाक दाखवत लूटमार, मर्सिडीजवर गोळीबार

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री एका टोळीने अवघ्या दोन तासांच्या अंतरात दोन ठिकाणी थरारक गुन्हे घडवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून (एमएच 39 जे 3147) आलेल्या भूषण गोसावी, दानिश शेख, सुमित (स्वप्नील) मोरे व त्यांच्या साथीदारांनी प्रथम नाशिकरोड बसस्थानक परिसरात एका रंगकाम करणार्‍या कारागिरावर जीवघेणा हल्ला करून 17 हजार रुपयांची लूट केली. त्यानंतर हीच टोळी देवळालीगावातील केशवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये जाऊन बांधकाम व्यावसायिकाच्या मर्सिडीज कारची तोडफोड करत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घटनांची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाट यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सुभाष रोड परिसरातील अफरोझ अक्तर खान (वय 35) हे रात्री साडेअकराच्या सुमारास नालंदा हॉटेलसमोरील पानटपरीवर तंबाखू घेण्यासाठी गेले होते. त्याचवेळी स्कोडा कारमधून आलेल्या आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. भूषण गोसावी याने हातात पिस्तूल दाखवत, कोण इथला भाई आहे, समोर येणार्‍याला गोळ्या घालू, अशी धमकी दिली.
सुमित मोरेच्या हातात लोखंडी हत्यार, दानिश शेखच्या हातात बिअरची बाटली, तर साहिलच्या हातात चॉपर होता. आरोपींनी पानटपरी चालकाकडे हप्त्याची मागणी करत धक्काबुक्की सुरू केली. अफरोझ खान मध्यस्थी करण्यासाठी पुढे येताच साहिलने त्यांच्या गळ्याला चॉपर लावला. दानिशने त्यांच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली, तर सोनू व मोनू शेख यांनी दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर भूषण गोसावी याने पिस्तूलाचा धाक दाखवत अफरोझ खान यांच्या खिशातील 17 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. परिसरात नागरिक जमा होत असल्याचे पाहून आरोपींनी आम्हीच इथले भाई आहोत, अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. जखमी अफरोझ खान यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेनंतर अवघ्या दीड-दोन तासांत हीच टोळी देवळालीगावातील केशवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पोहोचली. बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव हे घरात असताना आरोपींनी त्यांच्या मर्सिडीज एमएच 14 जीए 8369 कारवर दगड व फरशीचे तुकडे फेकून तोडफोड सुरू केली. दानिश शेखने लाकडी दांडक्याने कारचे हेडलाईट आणि काचा फोडल्या. आरडाओरडा ऐकून प्रशांत जाधव खिडकीत आले असता, भूषण गोसावी याने त्यांना शिवीगाळ करत आज तुझा गेमच वाजवतो,अशी धमकी देत गावठी पिस्तूलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने गोळी त्यांना न लागता मर्सिडीजच्या बोनेटवर जाऊन आदळली. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीची रिकामी पुंगळी जप्त केली आहे. गोळीबारानंतर आरोपींनी इमारतीतील नागरिकांनाही धमकावत प्रशांत जाधवला साथ देणार्‍याला जिवंत सोडणार नाही. नाशिकरोड परिसरात आम्हीच भाई आहोत, अशी दहशत निर्माण केली आणि अनुराधा टॉकीजच्या दिशेने स्कोडा कारमधून पसार झाले. प्रशांत जाधव यांच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली होती. तसेच डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या एमजी ग्लॉस्टर वाहनाचीही तोडफोड झाल्याचा आरोप याच टोळीवर आहे. आता पुन्हा त्याच आरोपींनी दोन ठिकाणी दहशत माजवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Same gang goes on a rampage at two locations in Nashik Road.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

16 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

16 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

16 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

17 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

17 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

17 hours ago