इशार्‍याची दखल

इशार्‍याची दखल
’भोंगा’ हा शब्द महाराष्ट्रात चांगलाच परवलीचा झाला आहे. सायरन या शब्दाचा मराठीत अर्थ भोंगा असून, लाऊडस्पीकर या शब्दाला ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक किंवा ध्वनी विस्तारक असे प्रतिशब्द आहेत. परंतु, लाऊडस्पीकर या इंग्रजी शब्दाला महाराष्ट्रात ’भोंगा’ म्हटले जात आहे. त्याचा अर्थ लोकांना चांगलाच कळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाषण करताना मशिदींवरील भोंगे (लाऊडस्पीकर्स) काढण्याची मागणी केली. येत्या तीन मेनंतर भोंगे काढले नाही, तर लोकांनी (हिंदूंनी) मशिदींसमोर भोंगे लावून ’हनुमान चालिसा’ दुप्पट आवाजात म्हणावा, असे आवाहन त्यांनी केले. ठाण्यात नंतर झालेल्या सभेत आणि पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याच आवाहनाचा पुनरुच्चार केला. मशिंदींवरील भोंगे काढण्याचा विषय सामाजिक असून, तो धार्मिक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असले, तरी हा विषय आता धार्मिक बनला आहे. आम्हाला दंगली आणि हाणामार्‍या करुन शांतता भंग करायची नाही, असे त्यांनी म्हटले असले, तरी भोंग्यांवरुन महाराष्ट्र तापल्याचे निश्चितपणे जाणवत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांच्या नेत्यांसह पुरोगामी पक्ष-संघटनांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले असले, तरी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल महाराष्ट्र सरकारला कायद्याच्या चौकटीत घ्यावी लागत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडू नये, यासाठी सरकार दक्ष झाले आहे. मशिदींवरील भोंगे खाली उतरावावे, अशा स्वरुपाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, लाऊडस्पीकर किंवा भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, नियमानुसार आवाजाची मर्यादा पाळली गेली नाही, तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या तीन मे रोजी रमजान ईद साजरी झाल्यानंतर मशिदींवरील भोंगे उतरविले नाही, तर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसैनिक किंवा हिंदू खरोखरच मशिदींसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात म्हणतील काय? हाच खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर मराठी तरुणांवर परप्रांतियांमुळे अन्याय होतो, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांनंतर महाराष्ट्रात येणार्या परप्रांतीय युवकांवर रेल्वेगाड्यांत आणि इतरत्र हल्ले झाले होते. टोलवसुलीवरुन मनसैनिकांनी राज्यातील अनेक टोलनाके बंद पाडले होते. हा इतिहास पाहूनच राज्य सरकारला राज ठाकरे यांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशार्‍याची दखल घ्यावी लागत आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी त्याच दिशेने राज्यात पहिले पाऊल उचलले आहे. सुरुवातीला मनसे जितकी पॉवरफुल्ल होती तितकी आता राहिलेली नाही. मात्र, राज ठाकरे यांच्या भाषणातील ’पॉवर’ कायम असल्याने तीन मेनंतर त्यांच्या भूमिकेकडे सरकारचे लक्ष लागले असून, राजकीय पक्षांनाही त्यांच्या कृतीची उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सजग झाली आहे.
विशेष खबरदारी
राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी सर्वप्रथम मनसेचा थेट उल्लेख करुन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश जारी केले आहेत. नाशिक हा मनसेचा एक बालेकिल्ला मानला जात असल्याने पांडेय यांनी तत्परता दाखविली आहे. मशिदींवरील भोंगे उतरविले नाही, तर मनसेला लाऊडस्पीकर्सवर हनुमान चालिसा किंवा भजन म्हणायचे असेल, तर परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी अजानच्या आधी आणि नंतर 15 मिनिटांत परवानगी दिली जाणार नाही. इतकेच नाही तर मशिदीच्या 100 मीटरच्या आत हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवर वाजवण्यास परवानगी राहणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. थेट संघर्ष टाळण्यासाठी आयुक्तांनी ही भूमिका घेतली असल्याचे दिसते. लाऊडस्पीकर वापरण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांना तीन मेपर्यंत परवानगी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले असून, त्यानंतर आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मनसैनिक किंवा अन्य कोणीही परवानगी न घेताच हनुमान चालिसा म्हणण्यासाठी लाऊडस्पीकरची परवानगी घेतली नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी जो निर्णय घेतला आहे, तोच निर्णय राज्यभर लागू केला जाण्याचे संकेत आहेत. पोलिसांच्या परवानगीनंतरच धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर्सचा वापर करण्यास राज्यात परवानगी दिली जाणार आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी संकेत दिले आहेत. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता यंदा रमजान ईदच्या दिवशी आणि नंतर मशिंदींच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त राज्य सरकारला ठेवावा लागणार आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी, मध्य प्रदेश, कर्नाटक, झारखंड या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला हिंसाचार पाहता राज्य सरकारला कडक बंदोबस्त ठेवणे अपरिहार्य आहे. दिल्लीतील हिंसक घटना पाहूनच दीपक पांडेय यांनी विशेष खबरदारी घेतली असल्याचे दिसते.
नियमावलीकडे आता लक्ष
लाऊडस्पीकरविषयी सरकारची नियमावली असून, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. संबंधित प्राधिकृत विभागाची (पोलिस) लेखी परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर वाजविता येणार नाही. परवानगी मिळाल्यानंतरही रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा वापर करता येणार नाही. धार्मिक आणि सण-उत्सवांसाठी रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, अशी परवानगी वर्षातील 15 दिवसच आहे. आपल्याकडे गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, शिवजयंती, आंबेडकर जयंती, नवरात्र उत्सवातील ठराविक दिवस आणि राज्य सरकार ठरवून देईल त्या दिवशी अशी परवानगी दिली जाते. बंदिस्त सभागृहातील कार्यक्रमांसाठी रात्री 10 ते सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची मुभा आहे. लाऊडस्पीकरला परवानगी दिल्यानंतर आवाजाची मर्यादा पाळावी लागते. भारतात 65 डेसिबलपर्यंतचा आवाज सामान्य मानला जातो म्हणजे त्यापेक्षा अधिक आवाज मानवाला बाधक ठरणारा आहे. डीजेवर बंदी घालण्यामागे हेच कारण आहे. एकूणच लाऊडस्पीकरसंबंधी नियमावली असली, तरी तिचे पालन केले जात नाही आणि पोलिस यंत्रणाही लक्ष देत नाही. अनेकदा परवानगीविना लाऊडस्पीकरचा वापर केला जातो. अनेक धार्मिकस्थळांनी परवानग्या घेतल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज ठाकरे यांच्या इशार्‍यानंतर राज्याच्या गृह विभागाने नियमावलीचे पालन करण्याचे ठरविले असून, नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी त्याच दिशेने पाऊल उचलले आहे. त्यात नवीन असे काही नाही. नियमावलीकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले होते. राज ठाकरे यांच्या इशार्‍याची दखल घेऊन नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *