सप्तधारा-युवाशक्ती

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना संबोधित केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेन-झेड अर्थात युवा पिढीची दखल जाणीवपूर्वक घेतली. कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. जंतर-मंतरवर युवा पिढीवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या घटनेवर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या घटनांची दखल घेऊन पंतप्रधानांनी 23 ते 31 जुलैदरम्यान तीन व्हिडिओज् सोशल मीडियावर टाकले. यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांच्या भाषणांचा केंद्रबिंदू जेन-झेड हाच राहत आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणातही त्यांनी जेन-झेडवर विशेष लक्ष दिले. एक वर्षात एक कोटी तरुण-तरुणींना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्किल्सचे मोफत/सुलभ प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी भाषणात केला. याशिवाय, स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग(शिकवणी)साठी एक लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरील कोचिंगचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देणे हा त्यांच्या घोषणेचा उद्देश आहे. ही दोन्ही घोषणा जेन-झेडच्या आकांक्षा आणि कौशल्य विकासाशी थेट संबंधित आहेत. तरुणांमधील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर जेन-झेडमध्ये उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया, त्यांची अस्वस्थता आणि त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन मोदी सरकारने 80 व्या स्वातंत्र्यदिनाची थीम (मध्यवर्ती संकल्पना) युवाशक्ती फॉर विकसित भारत अशी मांडली. युवा पिढीला विकसित भारत वाटचालीत सहभागी करून घेणे, हाच या संकल्पनेचा उद्देश आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनांची उजळणी करताना गेल्या 12 वर्षांत, म्हणजे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या बदलांचा आढावा घेऊन त्यापूर्वी काहीच झाले नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 12 वर्षांत देशात बरेच बदल झाले, हे बरोबर आहेच, परंतु स्वातंत्र्यानंतर काहीच झाले नाही, असे म्हणता येत नाही. देश स्वतंत्र झाला, तेव्हा परिस्थिती गंभीर होती. गरिबी, निरक्षरता, अन्नटंचाई, बेरोजगारी, आरोग्याच्या अपुर्‍या सुविधा आणि कमकुवत औद्योगिकीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव अशा नकारात्मक गोष्टींवर भारताने हळूहळू मात केली, ती लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातूनच. जगातील अनेक देशांतील राज्यव्यवस्था बदलल्या, नवीन देश उदयाला आले, परंतु भारताने लोकशाही टिकवली. गेल्या आठ दशकांमध्ये भारताची अर्थव्यवस्थाही आमूलाग्र बदलली. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक क्षेत्र आणि नियोजनाच्या माध्यमातून औद्योगिक पाया उभा करण्यात आला. हरितक्रांतीने अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण केले. 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडले. माहिती-तंत्रज्ञान, सेवा उद्योग, औषधनिर्मिती, दूरसंचार, डिजिटल अर्थव्यवस्था आणि स्टार्टअप क्षेत्राने भारताच्या आर्थिक क्षमतेला नवे परिमाण दिले. कदाचित म्हणूनच आजचा भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून उभा आहे. अंतराळ संशोधनात भारताने जगाचे लक्ष वेधले आहे. डिजिटल पेमेंटपासून अंतराळ मोहिमांपर्यंत आज भारताची तांत्रिक क्षमता दिसून येते. संरक्षण, अणुऊर्जा, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्येही देश पुढे जात आहे. हे सर्व बदल एकाकी झाले नाहीत. त्याच आधारावर पंतप्रधान विकसित भारताच्या गोष्टी करत आले आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी आपल्या भाषणात सप्तधारा मांडली 1) उत्पादन ः खर्च, गुणवत्ता आणि प्रमाणाच्या बाबतीत अत्यंत स्पर्धात्मक असले पाहिजे, 2) कृषी आणि अन्न प्रक्रिया : अन्न प्रक्रिया उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवण्याची गरज आहे, 3) तंत्रज्ञान आणि नवोपक्रम : डिजिटल आणि दळणवळण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, 4) स्पीड-शक्ती : येत्या काही वर्षांत आपण जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, 5) संरक्षण शक्ती : मोदींनी ड्रोन आणि सुपरसॉनिक तंत्रज्ञानासारख्या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सांगितले, 6) हरित आणि निळी अर्थव्यवस्था : आपल्याकडे हरित आणि निळ्या (सागरी) अर्थव्यवस्थेसाठी मुबलक संसाधने आहेत, यावर भर दिला पाहिजे, 7) सॉफ्ट पॉवर : योग, आयुर्वेद, समग्र आरोग्य, सर्जनशील संसाधने आणि पर्यटन यांना मान्यता दिली पाहिजे. अशा सात धारा त्यांनी सांगितल्या. येत्या काळात समाज, शेतकरी आणि सर्वांना त्यांच्या पारंपरिक पद्धतींमध्ये मोठे बदल करावे लागतील, असे सांगत त्यांनी देशाला एका विशिष्ट दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. एक विकसित भारत घडवण्यासाठी आपल्याला एका नव्या दिशेची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी 12 मे 2020 रोजी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करताना 5 मजबूत स्तंभ (पंचसूत्री) मांडले होते. 1) अर्थव्यवस्था : जी हळूहळू नाही, तर एकाच वेळी मोठी झेप घेईल अशी अर्थव्यवस्था, 2) पायाभूत सुविधा : आधुनिक भारताची ओळख बनेल असे जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यात येईल, 3) प्रणाली/सिस्टिम : 21 व्या शतकातील तंत्रज्ञानावर आधारित आणि आधुनिक नियमांनी चालणारी डिजिटल व्यवस्था निर्माण करणे, 4) लोकसंख्या : (ऊशोसीरहिू) : तरुण लोकसंख्या ही आपली सर्वांत मोठी ऊर्जा आणि ताकद आहे, तिचा योग्य वापर करणे, 5) मागणी (ऊशारपव) : आपल्या देशातील मागणी आणि पुरवठा साखळीचा (र्डीिश्रिू उहरळप) पूर्ण क्षमतेने वापर करून अर्थव्यवस्था मजबूत करणे. हे पाच स्तंभ पंतप्रधानांनी सांगितले होते. (टीप : याशिवाय मोदींनी 15 ऑगस्ट 2022 रोजी केलेल्या भाषणात पंचप्राण म्हणजेच पाच संकल्प मांडले होते. 1) विकसित भारताचे मोठे उद्दिष्ट, 2) गुलामगिरीच्या मानसिकतेतून पूर्ण मुक्ती, 3) आपल्या वारशाचा अभिमान, 4) एकता आणि एकात्मता आणि 5) नागरिकांची प्रामाणिक कर्तव्ये.) सप्तधारा मांडताना त्यांनी मे 2020 मधील आत्मनिर्भर भारत मोहिमेतील पाच स्तंभ आणि 15 ऑगस्ट 2022 रोजीच्या भाषणातील पंच संकल्प यांची सरमिसळ करून सप्तधारा मांडली आहे. ती मांडताना त्यांनी पाच स्तंभ व पंच संकल्प यांची उजळणी केली आहे; शब्दांचा खेळ करून त्यांनी थेट तेच सांगितले. मतदारसंघांची संख्या वाढवून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये आरक्षण देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण केले, तेव्हा त्यांनी विरोधकांवर टीका केली होती. महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन त्यांनी भाषणातून केले. तृणमूल काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) या पक्षांचे खासदार फोडूनही संसदेत घटनादुरुस्तीसाठी आवश्यक दोनतृतीयांश बहुमत तयार होत नसल्याचे पंतप्रधानांच्या लक्षात आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची जमवाजमव केली, तरी गणित सुटणार नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असल्याचे भाषणातून स्पष्ट झाले. विकास आणि युवाशक्ती यांवर भर देताना त्यांनी विरोधकांवर टीका केली, परंतु बौद्धिक नक्षलवाद असा शब्दप्रयोग करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले. आम्ही जंगलातील सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आणि देशाला त्या संकटातून मुक्त करण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, सशस्त्र नक्षलवादी संपले असले तरी दिमागी नक्षल अजूनही शिल्लक आहेत. आपण या दिमागी नक्षल्यांना ओळखलं पाहिजे. आपल्याला त्यांना वेगळं पाडण्याची आणि देशातील तरुणांना देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहातील प्रयत्नांशी जोडण्याची गरज आहे, असे विधान त्यांनी केले. भाजपाकडून विरोधकांना अर्बन (शहरी) नक्षलवादी म्हटले जाते; पंतप्रधानांनी आता ‘दिमागी नक्षलवाद’ हा शब्द
वापरला आहे.

Saptadhara-Yuvashakti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *