मंत्री भुजबळ : मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन
येवला : प्रतिनिधी
नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरवण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे (शस्त्रक्रिया गृह) उद्घाटन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप सूर्यवंशी, अनंत पवार, रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, सुमारे 2 कोटी 35 लाख रुपये खर्चातून उभारलेल्या या सुविधेमुळे शस्त्रक्रिया सेवा अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि रुग्णाभिमुख होणार आहे. हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आधुनिक वैद्यकीय मानके व तांत्रिक निकषांनुसार सज्ज करण्यात आले आहे. या ऑपरेशन थिएटरमध्ये विशेष सर्जिकल निर्जंतुकीकरण व्यवस्था, हेपा फिल्टर आणि पॉझिटिव्ह एअर प्रेशर प्रणाली बसवण्यात आली आहे. तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवून संसर्गाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने याची विशेष रचना केली आहे. याशिवाय अत्याधुनिक अॅनेस्थेशिया मशीन, ओटी लाईट्स, सर्जिकल पेंडंट, मेडिकल गॅस सिस्टिम आणि मॉनिटरिंग सिस्टिम यांसारख्या आधुनिक उपकरणांचा यात समावेश आहे.
मुंबई, पुणे व नाशिकसारख्या मोठ्या शहरांच्या धर्तीवर येवल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना संसर्गमुक्त वातावरणात उपचार मिळतील आणि मोठ्या शहरांत जाण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Citizens will have access to state-of-the-art services.