सप्तशृंगीदेवीला हिरव्या पैठणीसह अलंकार

दुसर्‍या माळेला आमदार नितीन पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

सप्तशृंगगड ः वार्ताहर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगगडावर सोमवार(दि.22)पासून शारदीय नवरात्रोत्सवाला भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी (दि.23) दुसर्‍या माळेला पहाटेपासून हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भाविकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र होते. सध्या नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा जागर सुरू आहे.
मंगळवारी (दि. 23) विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून ट्रस्टच्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत देवीच्या आभूषणांची मिरवणूक काढत आभूषणे मंदिरात नेण्यात आली. दुसर्‍या माळेची पंचामृत महापूजा कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी सपत्नीक केली. सप्तशृंगगड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदस्या बेबीबाई जाधव यांना देवीच्या पंचामृत महापूजेचे
यजमानपद देण्यात आले होते.
दुसर्‍या माळेला देवीला हिरव्या रंगाचे भरजरीचे पैठणी वस्त्र नेसवण्यात आले. सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची वज्रटिक, पुतळ्यांचे मोठे गाठले, कुयरी हार, मोहनमाळ, कर्णफुले, नथ, सोन्याचे पाऊल, पुतळी, लहान गाठले, चांदीचा कमरपट्टा आदी
आभूषणे परिधान करण्यात
आली आहेत.
यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार उपस्थित होते.

भाविकांसाठी विविध सुविधा

भाविकांसाठी ट्रस्टच्या अन्नपूर्णा प्रसादालयात मोफत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने मोबाइल टॉयलेट्स आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता व वैद्यकीय सुविधा दिवसरात्र उपलब्ध आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *