सावानाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील प्रमुख संस्था असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, 8 मे रोजी संस्थेसाठी मतदान होणार आहे. तर 9 तारखेला मतमोजणी होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘सावाना’चा कारभार चांगलाच गाजत आहे. कोर्टबाजीमध्ये अडकून पडल्यामुळे सावानाला कोर्टबाजीतून मुक्त करावे, यासाठी मध्यंतरी एक बैठकही पार पडली. मात्र, त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. आता निवडणुकीमुळे सावानाचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. विद्यमान पदाधिकारी यांचा एक पॅनल आणि विरोधात दोन पॅनल अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावानाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.एस. जी. सोनवणे यांनी सावाना कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी सावानाची लिखित घटना व दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या सावाना सभासद मतदानास पात्र मतदारांची अंतिम यादी ऍड. एस. जी. सोनवणे यांच्याकडे कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी सुपूर्द केली. त्यांना निवडणूक प्रक्रिया व कामकाजात सावाना सहा. व्यवस्थापिका योगिनी जोशी या सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्य करणार आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवार अर्ज विक्री व स्वीकृती :
16 ते 20 एप्रिल
अर्जांची छाननी : 22 एप्रिल
वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध : 23 एप्रिल
उमेदवारांची माघार 24-26 एप्रिल
अंतिम उमेदवारी यादी : 27 एप्रिल
चिन्ह वाटप : 27 एप्रिल
मतदान : 8 मे रोजी सकाळी 9 ते 5
मतमोजणी व निकाल 9 मे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *