स्क्रीन

– सुजाता येवले

(भाग 1)
खरे तर ’स्क्रीन’ म्हटले की आमच्या जनरेशनच्या डोळ्यापुढे येते ती सनस्क्रीन लोशन. सिनेमा किंवा टीव्हीच्या पडद्याला स्क्रीन म्हणतात हे आम्ही जेन -झेडकडून शिकलो. (जेन-झेडचे निर्माते आमचीच पिढी आहे हे जेन-झेडसोबत राहून आम्हीही कधीही विसरता कामा नये.) कॉम्प्युटर किंवा मोबाइल अस्तित्वात येण्याआधी सिनेमा टीव्हीला ’चलतचित्र’ असे मातृभाषेत म्हणायचे. हे आमच्या शिक्षकांनी शाळेत असताना शिकवले. त्यावरून मनात आणि मैत्रिणींमध्येही बराच काळपर्यंत हास्यकल्लोळ उडाला होता. भरपूर कोट्या करून झाल्यानंतर कॉम्प्युटर शिकणे आपसुक नशिबात आले आणि मोबाइल आयुष्याचे अविभाज्य अंग बनले. तेव्हापासून सिनेमा टीव्ही कॉम्प्युटर मोबाइल सगळेच स्क्रीन झाले. फक्त छोटा किंवा मोठा किंवा तळहातावरचा एवढाच काय तो फरक. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत स्क्रीनवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच जण बोटांनी बटणे दाबत सॉरी बोट नाजूकपणे फिरवत स्क्रीमिंग करू लागले.
स्क्रीन! काय मॉड शब्द आहे नाही! काही माणसांनी (वैज्ञानिकांनी) त्याचा आविष्कार निश्चितच मानव कल्याणासाठी केला आहे. कल्याण किती झाले माहित नाही! पण अवघे जनजीवन मात्र त्याने व्यापून टाकले. खूप पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा स्क्रीनवर बघण्यासाठी जाणार्‍यांना लोकं वेगळ्याच दृष्टीने बघायचे. स्त्रियांनी सिनेमा बघण्याची तर पद्धतच नव्हती. नंतर सिनेमात नट्या काम करायला लागल्या पण तरीही स्त्रियांना घरात कोंडून पुरुषवर्ग नटून थटून सिनेमे बघायला लागलाच. असे म्हणतात देवदास सिनेमाचा (सर्वांत पहिला के. एल. सैगलचा) तरुणाईवर खूप वाईट परिणाम झाला म्हणून आदरणीय व्ही. शांताराम यांनी तरुणाईला सुरळीत मार्गावर आणण्यासाठी ’माणूस’ चित्रपट काढला आणि त्या चित्रपटातील स्त्रीचे खंबीर नेतृत्व भरकटलेल्यांना योग्य दिशा दाखवणारी स्त्री बघण्यासाठी पुरुषवर्ग आवर्जून त्यांच्या डोक्यापासून अंगभर पदर लपेटून त्याच्या कारभारणीला सिनेमा दाखवायला नेऊ लागला. आमच्या लहानपणी सिनेमा बघण्यास मनाई नसली तरी तो बघण्यासाठी घरातल्या कुटुंबप्रमुखाची परवानगी जरूर घ्यावी लागायची. त्यांच्यापुढे उभे राहण्याची हिंमत नाही म्हणून गरीब बिचारी आई किंवा आजी बोलणे, टोमणे, वळण, संस्कार सगळ्याचा उद्धार ऐकत लेकरा बाळांना पैसे मिळवून द्यायची. अगदी ऐशी नव्वदच्या दशकापर्यंतची पिढी धाकात राहूनच सिनेमा बघायला थिएटर वर जायची.
नंतर टीव्ही स्क्रीनने सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रवेश केला. पण तरीही कुटुंब प्रमुखा शिवाय बटणांना हात लावायची हिम्मत कोणातच नव्हती. थोरली बंडखोर भावंडे मॅच बघत इतकेच. नंतर रामायण, महाभारत टीव्हीवर आले. त्याच्या बर्‍याच सुखद आठवणी आमच्या आणि आमच्या आधीच्या पिढीकडे आहेत. सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर वगैरे अशा छान छान एपिसोड्सला टीव्ही स्क्रीनला हळदी कुंकू वाहून पूजा करणार्‍या देवभोळ्या बायका होत्या. रावणाने सीतामातेला पळवल्यावर स्क्रीन कडे बघत कडाकडा बोटे मोडणार्‍या पण आईच्या सया बहिणी होत्या. महाभारतात भगवान श्रीकृष्ण म्हणजेच ’नितीश भारद्वाज’ जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा जानकी काकूंनी चक्क आमच्या देव्हार्‍यावरच्या रामाच्या फोटोचा हार काढून टीव्ही स्क्रीनला घातला होता. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तर दु:शासनाच्या आयाबायांचा देखील उद्धार झाला होता. ’सीता और गीता’ किंवा ’शोले’ मधल्या हेमामालिनीला बघून आमच्यात कोण वीरश्री संचारली होती!
आतासारखी टीव्ही म्युट करण्याची प्रथा त्या टीव्हीला नव्हती. त्यामुळे स्क्रीनवर जे चलतचित्र येईल ते बघण्याला पर्यायच नव्हता. कधीकधी टिव्हीच्या स्क्रीनवर मुंग्या येत मग वर टेरेसवर जाऊन अँटिना हलवण्यातही कोण मजा असायची. अँटिना हलवून चित्र आल्यास आई हातावर लाडू किंवा बर्फी ठेवायची. नोबेल पुरस्कार मिळाल्यागत वाटायचे. कधीतरी स्क्रीनवर निळे, गुलाबी, पोपटी असे पट्टे यायचे. आम्ही तेदेखील निरखून बघत असायचो. टिव्ही वर झी आणि सोनी चॅनल्स सुरू झाले. मनोरंजनात आणखी भर पडली.
नंतर मोठ्या भावाने सिंगापूरहून ’व्हीसीआर’ आणला. नागाच्या डोक्यावरून नागमणी काढून आणल्याच्या आदरयुक्त नजरेने आम्ही लहानगे भावाकडे आणि व्हीसीआरकडे बघत असू. मैत्रिणींसोबत वडील घरी नसताना ’मैने प्यार किया’ चित्रपट आम्ही कॅसेट आणून बघितला. माझ्या भोळ्या भाबड्या मैत्रिणी भावाला आदराने, शालीनतेने, खालमानेने थँक्यू म्हणायला चुकल्या नव्हत्या. भावाने पण वडीलकीच्या नात्याने आदर स्वीकारत ’तथास्तु’ म्हणून हात उंचावलेला आठवतो. ’अष्टविनायक’, ’लेक चालली सासरला’, ’माहेरची साडी’ किंवा तत्सम पिक्चर बघताना आईच्या सयाबहिणी डोळ्यात आसवांचा प्रचंड साठा घेऊन आलेल्या असाव्यात. काकू आत्या तर हिरॉइनच्या डोळ्यातले अश्रू स्क्रीनवर पुसण्यासाठी सरसावल्यासुद्धा होत्या. सगळ्यांना शांत करणे हाताबाहेर जायला लागले होते म्हणे. नंतर कित्येक दिवस तर अलका कुबल हसताना जरी दिसली तरीसुद्धा आयाबाया सहानुभूतीपूर्वक नजरेने डोळ्यात पाणी आणून तिच्याकडे बघत होत्या. ’लेक चालली सासर’ला पिक्चर बघून आल्यानंतर माझी मोठी मावशी माझ्या वडिलांना सारखी सांगत होती ’पोलीस केस करा! त्या गरीब बिचारीला त्या नराधमांनी जाळून मारले. लवकर जा; तिला डमिट करावे लागले तर बघा.’ रात्रभर बिचारी मुसमुसत होती. आम्ही लहानगे देखील हळवे होत होतो. मोठी भावंडे मात्र दाराच्या आड लपून हसत होती. ’नगिना’ पिच्चरच्या म्युझिकवर थिएटरच्या आजूबाजूला आणि स्क्रिनसमोरदेखील नाग डोलायचे म्हणे. आई-बाबांनी थिएटर मालकाला शेजारी बसवून पिक्चर बघितला होता. अस्मादिक आई-बाबांच्या मधे खुर्चीवर मांडी घालून सर्व अंग आक्रसून बसले होते. पाठीमागे कोणीतरी जोरात पॉपकॉर्नची पिशवी फोडली तर चारशे चाळीसचा करंट लागल्यागत भ्यालो होतो.
अगदी थोडेच पिक्चर थिएटरच्या स्क्रीनवर बघितले, पण कायमस्वरूपी स्मरणात राहिले.
टीव्हीला रिमोट आला आणि प्रत्येकाचीच दैनंदिन कामे टीव्ही रिमोटच्या तालावर होऊ लागली. सुरुवातीला फक्त चॅनल बदलणे किंवा आवाज कमी जास्त करणे हे घरातल्या इतर मंडळींच्या हातात होते. घरात स्वतःला टेक्निशियन समजणारे ताई दादा किंवा गल्लीतला एखादा स्मार्ट किंवा उच्चशिक्षित टीव्ही स्क्रीनचा ब्राईटनेस किंवा कलर कमी जास्त करण्यात मदत करत असे. आणि त्याच्या बुद्धिमत्तेची तुलना जागतिक कीर्तीच्या इंजिनिअर्सशी आमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी करत असत. अक्षी कानकोंडे झाल्यासारखे वाटायचे. लग्नानंतर चंदीगडला मिस्टरांच्या बदलीमुळे साडेचार वषर्ं राहणे झाले आणि स्क्रीनशी संबंध खर्‍या अर्थाने तुटला. परमभाग्य म्हणजे मुलाला टीव्ही किंवा मोबाईल दाखवत खाण्यापिण्याची सवय लागली नाही. सामान्य माणसाच्या जीवनात ’कॉम्प्युटर’ने ही प्रवेश केला होता. पण कॉम्प्युटर हे विद्यादान किंवा व्यापारी दृष्टिकोनातून जास्त वापरले जात होते. ’कॉम्प्युटर’ हा विषय कॉलेजमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमात होता. आम्ही बायोलॉजीवाले त्यांच्याकडे थोडं कौतुकानेच बघत असू. कॉम्प्युटर लॅबमध्ये जाणे अलाउड नव्हते. स्क्रीन खूप नाजूक असतो म्हणे. त्याला धुळीची, प्रदूषणाची एलर्जी असते म्हणून कॉलेजमध्ये कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे जरा जास्तच लाड होते. डिपार्टमेंट मधला शिपाई नवजात बाळाच्या त्वचेवरून मऊसूत टॉवेल फिरवावा त्या स्टाईलने कॉम्प्युटरच्या स्क्रीन वरून पिवळ्या रंगाचा मलमलचा कपडा फिरवत असायचा. 2000 सालापर्यंत कॉम्प्युटर आमच्या घरात आला तोपर्यंत त्याचा वावर घराघरात ऑफिसात सगळीकडे बोकाळला होता. वयामानाने स्क्रीन निबर होत गेला आणि मलमलचा कपडा अडगळीत पडल्यापडल्या विरू लागला. (क्रमश:)

Screen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *