– ज्योती जाधव
नको अपेक्षांच्या ओझ्याखाली
रोजच हरवायला,
कधीतरी शिकावं स्वतःसाठी
ही मनसोक्त जगायला
थकलेल्या पावलांना जशी
विसाव्याची आस असते,
तशीच धावत्या आयुष्यात
मनालाही सुट्टी हवी असते
सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत आपण सतत कुठल्या ना कुठल्या शर्यतीत धावत असतो. कधी यशाच्या मागे, कधी पैशांच्या मागे, तर कधी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या मागे! या सगळ्या धावपळीत शरीर थकलं की आपण त्याला विश्रांती देतो; पण सतत विचारांचं ओझं वाहणार्या मनाचं काय? त्याचा थकवा आपल्याला कधी जाणवतो का?
कधी मन म्हणतं आज काहीच नको ना उद्याची चिंता, ना कालच्या आठवणींचं ओझं, ना कोणाला काही सिद्ध करण्याची धडपड. फक्त काही क्षण स्वतःचे असावेत; जिथे घड्याळाची घाई नसेल, अपेक्षांचं ओझं नसेल आणि मनाला मनासारखं जगता येईल. कारण शरीराप्रमाणे मनही थकतं फक्त त्याच्या थकव्याला घाम येत नाही. म्हणूनच कधीतरी या धावत्या आयुष्याला थोडा विराम देऊन मनालाही हक्काची सुट्टी द्यायला हवी.
सकाळच्या पहिल्या अलार्मपासून सुरू झालेली आपली धावपळ रात्री उशिरापर्यंत थांबत नाही. शिक्षण, नोकरी, पैसा, यश, जबाबदार्या, अपेक्षा प्रत्येक गोष्टीमागे धावताना पाय थकले तर आपण थांबतो; पण मन थकलं तर? मनाच्या थकव्याला ना ताप येतो, ना जखम दिसते. म्हणून कदाचित त्याच्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो.
कधी मनालाही वाटत असेल ना….आज कोणाशी स्पर्धा नको, कोणाला काही सिद्ध करायचं नाही, कोणाच्या अपेक्षांचं ओझं वाहायचं नाही. आज फक्त स्वतःसोबत राहायचं आहे. मनसोक्त हसायचं आहे. आवडतं गाणं गुणगुणायचं आहे. खिडकीत बसून पावसाच्या सरी न्याहाळायच्या आहेत. गरम चहाचा कप हातात घेऊन वेळेचं भान विसरायचं आहे. कारण मनाच्या सुट्टीसाठी नेहमीच दूर कुठेतरी फिरायला जाण्याची गरज नसते; कधीकधी
स्वतःच्या जवळ परत येणं हीच मनासाठी सर्वांत सुंदर सहल असते.
तंत्रज्ञानाने जग आपल्या मुठीत आणलं, पण या मुठीतून मनाची शांतता मात्र नकळत निसटत गेली. मोबाइलच्या एका स्क्रीनवर शेकडो माणसं जोडली गेली, तरी मन मोकळं करावं असं एखादं माणूस शोधताना आपण आजही थांबतो. सोशल मीडियावर दुसर्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पाहताना आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांकडे दुर्लक्ष होतं. तुलना सुरू होते, अपेक्षा वाढतात आणि नकळत मनावर विचारांची धूळ साचत जाते.
कधी या मनावरची धूळ झटकायलाही हवी. मोबाइल काही काळ बाजूला ठेवावा. आईच्या शेजारी बसून मनसोक्त गप्पा माराव्यात. बाबांच्या न बोलणार्या प्रेमाला समजून घ्यावं. एखादं आवडतं पुस्तक उघडावं किंवा निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे काही क्षण घालवावेत. अशा छोट्या छोट्या क्षणांतच मनासाठी मोठा आनंद दडलेला असतो.
आपण अनेकदा जगाला विचारतो मी कसा दिसतो? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मी इतरांपेक्षा मागे तर नाही ना? पण कधीतरी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजेत कसा आहेस? कदाचित या एका प्रश्नाचीच ते कित्येक दिवसांपासून वाट पाहत असेल. कारण जगाची काळजी घेताना स्वतःच्या मनाची काळजी घेणं आपण सहज विसरून जातो.
आयुष्य म्हणजे सतत पुढे जाणं एवढंच नाही. कधी थांबणंही आयुष्याचाच एक भाग आहे. नदीसुद्धा प्रत्येक ठिकाणी सारख्या वेगाने वाहत नाही. कुठे ती खळखळून धावते, तर कुठे शांतपणे विसावते. मग माणसानेच सतत धावत राहण्याचा हट्ट का धरावा?
कधीतरी अपेक्षांची जड ओझं जरा खाली ठेवूया. कालच्या चुकांना माफ करूया आणि उद्याची चिंता काही काळासाठी बाजूला ठेवूया. आजचा क्षण फक्त आजसाठी जगूया. स्वतःशी पुन्हा ओळख करून घेऊया. कारण प्रत्येक सुट्टी कॅलेंडरवर लाल रंगाने दाखवलेली नसते.. काही सुट्ट्या आपण स्वतःलाच द्यायच्या असतात.कारण मनालाही एक रविवार हवा…..
शरीराचा थकवा झोपेने दूर होतो; पण मनाचा थकवा दूर करण्यासाठी स्वतःकडे परत यावं लागतं. म्हणून या धावत्या आयुष्यात कधीतरी थांबा, शांत बसा, मनाचंही ऐका, कारण तेही कित्येक दिवसांपासून एकच सांगत असेल… सगळ्यांसाठी खूप जगलास आता थोडं माझ्यासाठीही जग; कारण मलाही सुट्टी हवी आहे. आयुष्य फक्त धावत राहण्यासाठी नाही, तर प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी आहे. त्यामुळे कधी तरी थांबावे, स्वतःसाठी जगावे, मनसोक्त हसावे आणि मनाला त्याच्या आवडीच्या गोष्टी करू द्याव्यात. कारण शरीराला जशी झोप हवी असते, डोळ्यांना जशी शांतता हवी असते, तशीच आपल्या मनालाही अधूनमधून सुट्टी हवी असते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, जगाच्या गर्दीत स्वतःला हरवण्यापूर्वी थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. शरीराच्या थकव्याला विश्रांती द्या आणि मनाच्या थकव्यालाही समजून घ्या. कारण आनंदी जीवनासाठी केवळ शरीर निरोगी असून चालत नाही, तर मनही प्रसन्न असणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच, मनालाही सुट्टी हवी असते!
सतत धावणार्या आयुष्याला
कधीतरी विराम हवा असतो,
मनातल्या अबोल भावनांनाही
थोडासा आराम हवा असतो…
सगळ्यांना सांभाळताना
स्वतःलाही जपून घ्यावं,
कारण मनालाही कधीतरी
स्वतःचं एक शांत आभाळ हवं असतं..
शांत हाकेला अलगद प्रतिसाद द्यावा…
कारण प्रत्येक प्रवासाला
जशी एखादी सावली हवी असते,
तशीच जगण्याच्या अखंड धावपळीत
मनालाही हक्काची थोडी
विश्रांती हवी असते….
Searching for the self in silence
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…