कपालेश्वर मंदिरालगत भाविकांची सुरक्षा ऐरणीवर

वादळी पावसात भिंती, पत्रे व लाकडी साहित्य कोसळून भाविक जखमी

पंचवटी/सिडको : प्रतिनिधी
पंचवटीतील गोदाघाट परिसरातील कपालेश्वर मंदिरालगत असलेल्या धोकादायक आणि अनधिकृत बांधकामाकडे नाशिक महापालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित वाड्याला महापालिकेकडून वेळोवेळी धोकादायक, तसेच अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने नागरिक व भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित धोकादायक भाग हटविण्यासाठी लागणारा खर्चही संस्थानकडून भरून देण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिकेशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, हे बांधकाम आजही धोकादायक अवस्थेत कायम आहे.
मंगळवारी (दि. 2 जून) झालेल्या वादळी पावसादरम्यान या परिसरातील भिंतींचे भाग, पत्रे तसेच लाकडी साहित्य कोसळून काही भाविक जखमी झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दररोज शेकडो भाविक कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने या धोकादायक बांधकामामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठी जीवितहानी झाल्यानंतरच मनपा प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिरालगतचे धोकादायक आणि अनधिकृत बांधकाम तातडीने हटवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Security of devotees near Kapaleshwar temple on high alert

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *