कुंभातून माणुसकीचे अमृत शोधा

इंदुरीकर महाराज : कुंभ भक्तिसंगमचा समारोप

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ महाकुंभाच्या निमित्ताने केवळ स्नान, दर्शन न करता प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाचे मंथन करावे आणि त्यातून प्रेम, करुणा, सेवा व माणुसकीचे अमृत शोधावे, असा संदेश ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिला. भौतिक संपत्तीपेक्षा माणुसकी हीच खरी संपत्ती असून, गरजवंताच्या मदतीला धावून जाणे आणि समाजासाठी
निःस्वार्थपणे कार्य करणेस हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्तिसंगम’च्या समारोपाच्या कार्यक्रमात कीर्तनातून इंदुरीकर महाराज यांनी सिंहस्थ महाकुंभाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व उलगडले. कुंभ हा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, ज्ञान, साधना, समता, सेवा आणि मानवतेचा महासंगम असल्याचे सांगितले.
समुद्रमंथनाच्या कथेतून जीवनाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, समुद्रमंथनातून प्रथम हलाहल विष आणि त्यानंतर अमृत प्राप्त झाले. त्याचप्रमाणे जीवनातही सुख-दुःख, संकटे आणि संधींचे मंथन होत असते. संकटाच्या काळात भगवान शंकरांनी हलाहल विष धारण करून सृष्टीचे रक्षण केले, ही त्याग आणि परोपकाराची शिकवण आहे. प्रत्येकानेही स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुंभ हा कोणत्याही एका संप्रदायाचा नसून सर्वांचा आहे. शैव, वैष्णव, वारकरी, नाथ तसेच विविध आखाडे, साधू-संत आणि भक्तिपरंपरा यानिमित्ताने एकत्र येतात. जात, कुळ, श्रीमंती अथवा प्रतिष्ठेचे भेद बाजूला ठेवून सर्वांना समानतेने सामावून घेणारी कुंभ परंपरा भारतीय संस्कृतीची मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिंहस्थ महाकुंभाच्या निमित्ताने गोदावरी स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. गोदावरी ही नाशिककरांच्या श्रद्धेतील माता असून, तिचे पावित्र्य जपणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने नागरिकांनी स्वच्छता, शिस्त आणि सेवाभावातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसराचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना प्रभू श्रीरामांच्या वास्तव्यामुळे नाशिक ही रामभूमी, संतपरंपरेमुळे संतभूमी आणि अमृतकुंभाच्या परंपरेमुळे अमृतभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. या पवित्र भूमीत होणारा सिंहस्थ स्वच्छ, शिस्तबद्ध आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरविण्यासाठी प्रत्येक नाशिककराने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तीन दिवस रंगलेल्या ‘कुंभ भक्तिसंगम’मध्ये देशभरातील विविध संतपरंपरा, कीर्तन, अभंग, गुरबाणी, संकीर्तन आणि भक्तिसंगीताचा सुरेल अनुभव रसिकांना मिळाला. विविध भक्तिसादरीकरणानंतर ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रभावी कीर्तनाने ‘कुंभ भक्तिसंगम’चा भक्तिमय समारोप झाला.
यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

Seek the nectar of humanity from the Kumbh.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *