तरुणाचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक; जबरी लूटप्रकरणी तिघे ताब्यात

अंबड पोलिसांची कारवाई; 20 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सिडको : प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडील रोकड आणि मोबाइल जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याचा प्रकार अंबड परिसरात घडला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, कोयता आणि स्कॉर्पिओ असा एकूण 20 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अन्य फरार आरोपींचा पोलिस शोध सुरू आहे.
या प्रकरणी फिर्यादी मयूर नारायण भुसारे (23, रा. खुटवडनगर, अंबड) यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते मित्र सूरज सिंग याच्यासोबत वावरेनगर, खुटवडनगर येथे बसले होते. त्यावेळी अजिंक्य उर्फ अज्जू पगारे, सूरज नाडे, सुनील गांगुर्डे आणि शिवाजी जाधव हे स्कॉर्पिओमधून तेथे आले. त्यांनी जय कुमावत याला जुन्या भांडणाची कुरापत काढून फोन का केला, अशी विचारणा करीत भुसारे आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी अज्जू पगारे याने स्कॉर्पिओमधून कोयता काढून भुसारे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवल्यानंतर कोयत्याच्या मुठीने त्यांच्या डोक्यात मारहाण करण्यात आली. त्यानंतर भुसारे आणि त्यांच्या मित्राला जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून हॉटेल राधाकृष्ण परिसरात नेण्यात आले.
तेथे आणखी काही साथीदारांनी दोघांना मारहाण करून शिवीगाळ केली. सचिन गोसावी याने वाहनातून काळ्या रंगाचे पिस्तूल काढून भुसारे यांच्या दिशेने रोखत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवा नाठे आणि आर्यन पगारे यांनी भुसारे यांच्या खिशातील तीन हजार रुपये आणि ओप्पो कंपनीचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत
नमूद आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शंकर वाघमोडे यांनी तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर आणि गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या.
गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सूरज बालाजी नाडे (24), गणेश रतन रोकडे (26) आणि सुनील बाळू गांगुर्डे (27, तिघे रा. कांबळेवाडी, स्वारबाबानगर, सातपूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यातील अन्य फरार आरोपींची माहिती पोलिसांना
मिळाली.
पिस्तुलासह स्कॉर्पिओ जप्त
पोलिसांनी कारवाईत 30 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, 200 रुपये किमतीचा कोयता आणि 20 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ कार असा एकूण 20 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांच्या नेतृत्वाखाली
करण्यात आली.
या पथकात पोलीस हवालदार सुभाष ठुबे, योगेश देसले, उल्हास गांगुर्डे, तसेच पोलीस कर्मचारी सागर जाधव, मयूर पवार, अनिल गाढवे, फरिद इनामदार, तुषार मते, गणेश कोठुळे, मधुकर राव, शिवाजी गुंजाळ, संजय सपकाळे, प्रवीण राठोड, वैभव एखंडे, योगेश शिरसाठ, सचिन करंजे, दीपक निकम आणि सतीश जाधव यांचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर आणि पोलीस कर्मचारी वैभव एखंडे
करीत आहेत.

Youth kidnapped and threatened with a pistol; three detained in a case of armed robbery.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *