♦ अनेक राज्यांमध्ये तापमान
45 अंश सेल्सिअसपर्यंत
♦ पुढील तीन दिवस
पावसाचासुद्धा इशारा
♦ विदर्भ, मध्य
प्रदेशात कहर
नवी दिल्ली :
देशात तीव्र उष्णतेच्या लाट असून, अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, हवामान विभागाने येत्या आठवड्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, उष्णतेपासून तत्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दुपारी 12 ते 4 या वेळेत लोकांनी घरातच थांबावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान आधीच 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तापमान सामान्य तापमानापेक्षा किमान 4.5 अंश सेल्सिअसने जास्त होते, तेव्हा उष्णतेची लाट जाहीर केली जाते आणि सध्या अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडली जात आहे.
राजस्थान व ओडिशामध्येही उष्णतेची लाट शिगेला पोहोचली आहे. तापमान सामान्यपेक्षा 4.5 अंशांनी जास्त आहे.
विदर्भ, मध्य प्रदेशात सर्वाधिक तीव्र उष्णता
या आठवड्यात विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे सर्वांत उष्ण प्रदेश राहिले. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतही कडक ऊन आहे. ओडिशा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि पूर्व किनारपट्टीवरील तामिळनाडूमध्ये उष्णता आणि आर्द्रतेमुळे जीवन कठीण झाले आहे. जास्त आर्द्रतेमुळे घामाचे बाष्पीभवन होत नाही, त्यामुळे तापमान प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा खूप जास्त जाणवते. हवामान विभागाच्या मते, ही तीव्र उष्णता किमान 22 एप्रिलपर्यंत कायम राहील. पूर्व उत्तर प्रदेशात 20 एप्रिलच्या सुमारास काहीसा दिलासा मिळू शकतो, तर विदर्भ आणि मध्य भारतातील तापमान काहीसे लवकर कमी होऊ शकते. राजस्थान आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट 22 एप्रिलपर्यंत कायम राहील, तर झारखंडमध्ये 21 एप्रिलपर्यंत कोणताही दिलासा मिळणार नाही. पुढील तीन ते चार दिवसांत मैदानी प्रदेशात दिलासा मिळण्याची कोणतीही आशा नाही.
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील हवामान थोडे सौम्य राहील. पुढील 72 तासांत दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि उपहिमालयीन पश्चिम बंगाल यांसारख्या ईशान्येकडील लहान राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे तापमानात घट होऊन या भागांतील लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तर राजस्थान आणि पश्चिम हरियाणात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Severe heat wave in India