सिडकोतील त्रिमूर्ती चौकात ‘हीट शेल्टर’
सिडको : प्रतिनिधी
एकेकाळी आल्हाददायक आणि थंड हवामानासाठी ओळखले जाणारे नाशिक आता वाढत्या तापमानाच्या झळा सोसू लागले असून, यंदाच्या उन्हाळ्यात उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. दैनंदिन कामकाज, नोकरी आणि उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणे अपरिहार्य असताना विशेषतः दुचाकीस्वारांना कडक उन्हाचा मोठा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सिग्नलवर काही क्षणांची का होईना सावली मिळावी, या उद्देशाने सिडकोतील त्रिमूर्ती चौकात ‘हीट शेल्टर’ उभारण्याचा अभिनव संकल्प नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. या उपक्रमामागील संकल्पना युवानेते दीपक बडगुजर यांची असून, ‘थोडीशी विश्रांती, सावलीसोबत’ ही अर्थपूर्ण टॅगलाइन देण्यात आली आहे.
नाशिकचा पारा यंदा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागल्याने शहराच्या हवामानात झालेला बदल प्रकर्षाने जाणवू लागला आहे. पूर्वी एसी किंवा कूलरची गरज क्वचित भासणार्या नाशिकमध्ये आता घराघरांत शीत उपकरणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. उष्णतेची सवय नसलेल्या नागरिकांना बाहेर पडताना विशेष त्रास सहन करावा लागत असून, सिग्नलवर एक ते दोन मिनिटांची प्रतीक्षादेखील आरोग्यास धोकादायक ठरू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
याच जाणिवेतून त्रिमूर्ती चौकात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणारे हे ‘हीट शेल्टर’ नाशिक शहरातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. सिग्नलवर थांबणार्या वाहनचालकांना क्षणभर सावलीचा आधार देत उष्णतेपासून दिलासा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे, अशी माहिती दीपक बडगुजर यांनी दिली.
टप्प्याटप्प्याने इतर सिग्नलवरही सुविधा देणार
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास टप्प्याटप्प्याने शहरातील इतर प्रमुख चौक आणि सिग्नलवरही अशा प्रकारची सुविधा उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरी सोयीसुविधांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरणार असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात थोडासा दिलासा देणारा हा प्रयत्न नाशिककरांसाठी स्मरणीय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Shade for bikers at signals