घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत देवीचा जागर
नाशिक : प्रतिनिधी
आदिशक्तीची उपासना म्हणून ओळख असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून (दि.22) प्रारंभ होणार असल्याने चैतन्याची अनुभूती दिसून येत आहे. यंदा सोमवार, दि.22 ते बुधवार, दि. 1 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव आहे.
आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून तर विजयादशमीपर्यंत अकरा दिवस आदिशक्तीचा जागर होणार आहे. घटस्थापनेने या नवरात्रोत्सवाचे पर्व सुरू होत आहे. दसऱ्याला त्याची सांगता होईल. स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र कमालीचे चैतन्य निर्माण झाले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होणार आहे. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकामाता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात देवींची विविध ठिकाणी मंदिरे असून, तेथे आदिशक्तीचा जागर होणार आहे. नऊ दिवस देवीच्या नावाने उदोउदो केला जातो. कोटमगाव येथे अनेक भाविक घटी बसतात. चांदवड येथेही घटी बसणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून दांडिया-रास कार्यक्रमाबरोबरच आकर्षक बक्षिसांचीही लयलूट करण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी
नवरात्रोत्सवासाठी विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठांंत गर्दी झाल्याचे चित्र होते. पूजेच्या साहित्यासह आकर्षक रंगाचे घागरे, साडी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. खरेदीचा उत्साह बाजारपेठेत जाणवू लागला आहे.
मंदिरांना आकर्षक सजावट
नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त शहरातील देवीच्या विविध मंदिरांत विद्युत रोषणाईसह फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देवीच्या मंदिरांत भजन व कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घटस्थापनेचा मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. यंदा हा दिवस 22 सप्टेंबर आहे. रात्री 1 वाजून 23 मिनिटांनी घटस्थापना सुरू होईल. हा शुभ मुहूर्त 23 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजून 55 मिनिटांपर्यंत कायम राहील. या कालावधीत देवीची पूजा सर्वाधिक फलदायी मानली जाते.