नाशिकरोड : अनिल गुंजाळ
नाशिकरोड परिसरातील रस्त्यांवर चंद्रावरील खड्ड्यांचा अनुभव नागरिकांना दररोज येत असताना, महापालिकेच्या कुंभकर्णी झोपेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. वारंवार निवेदने, आंदोलनं आणि सर्वपक्षीय मागणीनंतरही मनपा प्रशासनाची उदासीनता कायम असून, अजून किती अपघात आणि बळी गेल्यावर रस्त्यांची दुरुस्ती होणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
नाशिकरोड परिसरातील बिटको चौक ते दसक-पंचकपर्यंत खड्डेच खड्डे आहेत. नांदूरनाका पुलावर तर खड्ड्यांमुळे रस्ताच बंद पडण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, सिन्नर फाटा चौक, देवळाली गाव आर्टिलरी सेंटर रोड, दत्त मंदिर रोड तसेच नाशिक-पुणे महामार्ग या ठिकाणी चंद्रावरील खड्ड्यांना लाजवतील असे मोठे खड्डे
पडले आहेत.
नाशिकरोड परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. उपनगरांतील छोट्या रस्त्यांपासून ते महामार्गापर्यंत सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नागरिक आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बिटको उड्डाणपूल, उपनगर, शिंदे, पळसे येथे खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी गेले तरी प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होत नाही. अपघात झाला, नागरिकांनी आरडाओरडा केला तर नावाला मलमपट्टी करायची, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मूग गिळून गप्प बसायचे, असे चित्र वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. खड्डे बुजविणार तरी केव्हा? असा सवाल नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे.
विशेषतः बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक व सिन्नर फाटा उड्डाणपुलावर खड्ड्यांचे प्रमाण अधिक असून, या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. खड्ड्यांमुळे वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने गाडी चालविणे आणखी धोकादायक ठरत आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीही होते. याशिवाय, वाहनांचे टायर, सस्पेन्शन आणि शॉकबसर खराब होऊन वाहनधारकांचा खर्च वाढत आहे. नागरिकांचे आरोग्य खड्ड्यांमुळे बाधित होत आहे. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात भाविक मोठ्या प्रमाणावर शहरात दाखल होतात. त्यांच्यासाठी रस्ते दुरुस्त करणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. नाशिकरोड परिसरातील विविध राजकीय पक्षांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली. तथापि, अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’ असून, नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे.
नाशिकरोड परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न हा अतिशय गंभीर आणि जिव्हाळ्याचा असून, महापालिका प्रशासनाची याबाबतीतील उदासीनता निंदनीय आहे. या खड्ड्यांमुळे कित्येक नागरिकांना अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, तर अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आले आहे. तरीसुद्धा प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. कित्येकदा निवेदन देऊन, महापालिका प्रशासन निष्क्रिय राहिले आहे. यापुढे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन आणि महापालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडणार आहे.
– दिनेश निकाळे
अध्यक्ष, नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीसध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती बघता परोपकारी गंपूचीच आठवण येते. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व यंत्रणा यांचे एकमेकांवर जणू परोपकार करण्याची प्रथा सुरू आहे, असे वाटते. यात जनतेची लूट मात्र ठरलेली आहे. पुण्याच्या जंगलीदास महाराज रस्त्याचे अनेक किस्से, कथा ऐकतो, पाहतो आहे. त्याचा आदर्श मात्र कुणी घेताना दिसत नाही. फक्त रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, सर्वपक्षीय आंदोलने, अभिनव टीकास्त्र हेच बघायला मिळते. मात्र, प्रत्यक्षात कृती तीच…. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर. खरोखर क्रांतीची गरज आहे, असे वाटते आहे.
– राजेंद्र ताजणे
मित्रमेळा युवक मंडळ संस्थापक अध्यक्ष