संपादकीय

‘ती’ सर्व क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करण्यास सज्ज

सगळीकडे येत्या रविवारी (दि. 8 मार्च) जागतिक महिला दिन साजरा केला जाईल. ’ती’चे गुणगौरव गायले जातील, ’ती’च्या सन्मानाच्या गोष्टी होतील, सोहळे समारंभ होतील, महिला राजचे गोडवे गायले जातील, ती किती शक्तिशाली आहे, कर्तृत्ववान आहे हे सांगण्याची चढाओढ लागेल. ती बेटी आपल्यापैकी कुणाची लाडकी लेक असते, कुणाची तरी अर्धांगिनी बनते, माता बनते, आजीच्या भूमिकेत आपले कर्तव्य पार पाडते, कुटुंब जोडते, पिढी घडवते, समाज घडवते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, असे जीचे वर्णन केले जाते ती देश की बेटी आज राजकारण, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रात अंतराळात भरारी अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहे, उच्च शिक्षण घेते आहे.
जगाला गवसणी घालते आहे.जगाच्या, देशाच्या, समाजाच्या जडणघडणीत आपले मोलाचे योगदान देत आहे. आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे. प्रत्येक संकटाला धीराने तोंड देत पुढे जात आहे. ’ती’ने केवळ चूल आणि मूलच सांभाळावे, ’ती’ने शिकू नये या आपल्या पूर्वीच्या काळी असलेल्या सामाजिक व्यवस्थेत आज आमूलाग्र बदल झाला आहे, जीच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक पातळीवर महिला दिन म्हणून साजरा केला जातो.अर्थात, ’ती’च्या परिवर्तनाचे श्रेय सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, महात्मा जोतिराव फुले, यांच्यासारख्या तत्कालीन समाजसुधारकांकडे मोठ्या प्रमाणावर जाते. देशात आपले कर्तृत्व सिद्ध करणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाला जन्म देणार्‍या जिजाऊ माता, अहिल्याबाई होळकर, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, रमाबाई रानडे यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी, थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ, अवकाशात भरारी घेणारी कल्पना चावला, क्रीडाक्षेत्र गाजविणार्‍या पी. टी उषा, मेरी कोम, रेल्वे चालविणारी सुरेखा यादव, लता मंगेशकर, अशा अनेक कर्तृत्ववान महिलांची मोठी यादी ही देशाची शान आहे, अभिमान आहे. आजची ’ती’ तर घराचा उंबरठा ओलांडून घर आणि दारदेखील सांभाळू लागली आहे. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील यांनी तर राष्ट्रपतिपद सांभाळले. आता द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतिपद भूषवत आहेत. त्याच वेळी आजची नारी ना देशात सुरक्षित आहे, ना राज्यात. रोज कुठे ना कुठे ती अत्याचार, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरत आहे. ती कुठेच सुरक्षित नाही, हे पुण्यातील घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्वारगेटसारख्या 24 तास वर्दळ असलेल्या भागात चक्क बसस्थानकावर जिथे अनेक सुरक्षारक्षक असतात, तिथे एक नराधम बसमध्येे एका तरुणीवर अत्याचार करतो काय आणि बिनधास्तपणे निघून जातो काय, हे सगळे भयानक वास्तव आहे. देश व राज्यपातळीवर महिला व बालकल्याण मंत्रालय, केंद्र व राज्यपातळीवर महिला आयोग कार्यरत आहे, तरीदेखील अशा घटनांना आळा बसताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी देशाला हादरवून सोडले होते, पश्चिम बंगालमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होत आहे. त्याचबरोबर पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात काही तरुणी नशेच्या आहारी सापडल्या, तसेच अनेक महिला भ्रष्टाचार, समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होत आहेत, हे निश्चितच नारीशक्तीला शोभनीय नाही. एकीकडे नारी देवीच्या रूपात पुजली जाते, तर दुसरीकडे समाजातील काही विकृत मानसिकतेकडून ’ती’ची विटंबना केली जाते.केवळ एक दिवसाचा महिला दिन साजरा करून काय साध्य होते? महिलांना सत्तेत आरक्षण मिळावे असे सगळेच सांगतात. मात्र, तशी इच्छाशक्ती कोणाचीच दिसत नाही. म्हणूनच आजवर महिला आरक्षणाबाबत केवळ चर्वितचर्वण चालू आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी नारीशक्ती वंदन कायदा मंजूर केला आहे,
या कायद्यामुळे महिलांना लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधित्व मिळणार आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी कधी होणार याबाबत साशंकताच आहे. समाधानाची बाब म्हणजे, आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत. पण भारत की बेटी ना राज्यात सुरक्षित आहे ना देशात, ती कुठेच सुरक्षित नाही, हे कटू वास्तव आहे. पंचायत राज कायदा आल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यात महिलांना राजकीय आरक्षण मिळाले. मात्र, विधानसभा व लोकसभेत तसे आरक्षण लागू नाही. गेल्या काही वर्षांपासून राज्यातून बेपत्ता होणार्‍या महिला, मुली यांची आकडेवारी तसेच महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना राज्याच्या लौकिकास शोभनीय नाहीत.
आजची नारी ही सर्वार्थाने शक्तिमान आहे, सर्व क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास ती सज्ज आहे, ती समाज घडवते, कुटुंब, देश चालवते. सर्व समाजात अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे, आपली ओळख निर्माण केली आहे, भविष्यात अशीच वाटचाल सुरू राहणार आहे. समाजव्यवस्थेत 50 टक्के वाटा असलेल्या महिलांबाबत समाजातील चित्र ’कभी खुशी कभी गम’सारखे आहे. केवळ कायदे करून, यंत्रणा उभारून, कागदी घोषणा, जाहिरातबाजी हे पुरेसे नाही, तर समाजातील मानसिकता बदलायला हवी. ’ती’ला सुरक्षित वातावरण हवे आहे. दुर्दैवाने तसे वातावरण नाही, हे कटू वास्तव आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीला वंदन!

‘She’ is ready to prove her worth in all fields

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago