मजबूत असण्याची अपेक्षा करताना तिच्या मनाचा आवाज आपण ऐकतोय का? आई, माझा डबा झाला का?
हो, करतेय मम्मी. माझी फाइल कुठे ठेवलीस? थांब, देते. आज ऑफिसला लवकर जायचं आहे ना? हो, फक्त पाच मिनिटं. स्वयंपाकघरात गॅसवर चहा उकळत असतो. एका हाताने डब्यांची लगबग सुरू असते, दुसर्या हाताने मुलांची तयारी. मोबाइलवर ऑफिसचे मेसेज येत असतात. घड्याळ पुढे सरकत असतं आणि ती मात्र सगळ्यांच्या वेळेशी जुळवून घेत असते.
सगळ्यांची कामं झाली की, ती आरशासमोर दोन क्षण उभी राहते.
चेहर्यावर थकवा स्पष्ट दिसत असतो. पण ओठांवर नेहमीसारखंच एक हलकंसं हसू
आणि मग कुणीतरी सहज म्हणतं, तू ना, खूप स्ट्राँग आहेस!
तीही हसते. पण मनात कुठेतरी एक आवाज उमटतो,
हो, पण मला कधीकधी थकायलाही परवानगी आहे का?
तू खूप स्ट्राँग आहेस! हे वाक्य आपण अनेक महिलांना अगदी सहजपणे म्हणतो. कौतुक म्हणून म्हटलेले हे शब्द सुंदर आहेत, पण या कौतुकामागे नकळत एक अपेक्षा तयार होते, ’ती’ने प्रत्येक परिस्थितीत मजबूतच राहावे, तिने रडू नये, तिने तक्रार करू नये आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी सगळं सांभाळावं.
घर, नोकरी, मुलं, नाती, सामाजिक जबाबदार्या आणि स्वतःची स्वप्नं. स्त्री अनेक भूमिका एकाच वेळी निभावत असते. ती आजारी असली तरी घर थांबत नाही. ती मानसिकदृष्ट्या थकलेली असली तरी जबाबदार्या तिची वाट पाहत असतात. तिच्या चेहर्यावरचं हसू पाहून आपण अनेकदा गृहीत धरतो की, ती ठीक आहे. पण हसणं म्हणजे नेहमी आनंदी असणं नसतं.
कधीकधी त्या हसर्या चेहर्यामागे प्रचंड थकवा दडलेला असतो. कधी तिला सल्ला नको असतो, उपाय नको असतो, फक्त कोणीतरी जवळ बसून विचारावं असतं, तुला खरंच कसं वाटतंय?
स्त्रीला प्रत्येक गोष्ट एकटीनेच करावी लागते, ही कल्पनाच आपण बदलायला हवी. मला मदत हवी आहे, आज मला जमत नाही, मला थोडा वेळ स्वतःसाठी हवा आहे, असं म्हणणं कमजोरी नाही.
’ती’च्या नाही या शब्दाचाही तितकाच आदर झाला पाहिजे. कुटुंब असो, नोकरी असो किंवा सामाजिक अपेक्षा, तिच्या मताला आणि निर्णयाला महत्त्व मिळणं आवश्यक आहे.
महिलांना फक्त तुम्ही सगळं करू शकता असं सांगण्यापेक्षा कधीकधी कुणीतरी एवढंच सांगायला हवं, तुम्हाला सगळं एकट्याने करण्याची गरज नाही. कारण स्त्रीची ताकद केवळ सहन करण्यात नाही. ती गरज पडल्यास थांबण्यातही आहे. मदत मागण्यातही आहे.स्वतःच्या भावनांना स्वीकारण्यातही आहे. आणि गरज पडल्यास ठामपणे ’नाही’ म्हणण्यातही आहे.
’ती’ आई आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, सून आहे, कर्मचारी आहे, शिक्षिका आहे, अधिकारी आहे, पण या सगळ्या नात्यांच्या आणि भूमिकांच्या पलीकडे ’ती’ एक व्यक्ती आहे. तिच्याही काही इच्छा आहेत. काही अपूर्ण स्वप्नं आहेत. काही दिवस असे आहेत जेव्हा तिला फक्त शांत बसायचं आहे. काही क्षण असे आहेत जेव्हा तिला कुणासाठी काहीच करायचं नाही.
आणि हे चुकीचं नाही.
तिलाही थकण्याचा अधिकार आहे.
तिलाही थांबण्याचा अधिकार आहे.
तिलाही मदत मागण्याचा अधिकार आहे. आणि सर्वार्ंत महत्त्वाचं, ’ती’लाही स्वतःसाठी जगण्याचा अधिकार आहे.
कदाचित पुढच्या वेळी आपण एखाद्या स्त्रीला तू खूप स्ट्राँग आहेस असं म्हणण्याआधी एकदा विचारूया, तुला काही मदत हवी आहे का? कदाचित तिच्यासाठी हे दोन शब्द एखाद्या मोठ्या कौतुकापेक्षाही अधिक मौल्यवान असतील.
‘She’, too, has the right to get tired..!