प्रभाग 31 मध्ये शिवसेनेचा झंझावात!

‘लाडक्या बहिणीं’चा उदंड प्रतिसाद

सिडको : विशेष प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फुटताच शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर भगवामय केला आहे. पाथर्डी शिवारातील राणेनगर येथील सप्तशृंगी माता मंदिरात श्रीफळ वाढवून शिवसेनेच्या चारही अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा झंझावाती शुभारंभ केला. पहिल्याच दिवशी मिळालेल्या जनसमुदायाच्या प्रतिसादामुळे मतदारसंघात शिवसेनेने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार: अ गट : डॉ. अविनाश शिंदे, ब गट : अर्चना गामणेे, क गट : संगीता जाधव ड गट : सुदाम डेमसे या चौघांनीही राणेनगर, चेतनानगर, आवड चौक, साठ बंगला परिसर, किशोरनगर आणि राममंदिर परिसरातील हजारो घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. विकास आणि विश्वास हा अजेंडा घेऊन रिंगणात उतरलेल्या या उमेदवारांचे मतदारांनी ठिकठिकाणी स्वागत केले. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेला सन्मान आम्ही विसरणार नाही. या निवडणुकीत आम्ही शिवसेनेच्या पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करू, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या.

लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि औक्षण

या प्रचाराचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. अनेक ठिकाणी माता-भगिनींनी घराबाहेर येत उमेदवारांचे औक्षण केले आणि विजयाचा टिळा लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोककल्याणकारी योजनांचा, विशेषतः ’माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी, आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी आणि धनुष्यबाणासोबत खंबीर आहोत, असा शब्द दिला.

’धनुष्यबाणा’च्या घोषणांनी परिसर दणाणला

प्रचारादरम्यान तरुण-तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. ’शिंदेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ आणि ’खिचके तान, धनुष्यबाण’ अशा घोषणांनी प्रभाग 31 दुमदुमून गेला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *