ग्रामपरिक्रमा सोहळा : कुंभरथ, साधू-संतांचे रथ, शंखनाद पथके ठरणार आकर्षण
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नाशिक येथील रामतीर्थ (रामकुंड), पंचवटी येथे 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आणि सिंहस्थ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहस्थ महाध्वज प्राणप्रतिष्ठा, ध्वजारोहण आणि ग्रामपरिक्रमा होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी महाध्वजारोहण व गोदाआरती होईल. या सोहळ्याने सिंहस्थ महाकुंभपर्वाचा प्रारंभ होणार आहे. या मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सिंहस्थ समिती विश्वस्त सतीश शुक्ल, आखाडा परिषदेचे महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज, श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे सचिव प्रतीक शुक्ल उपस्थित होते.
सिंह म्हणाले की, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मोदी मैदान येथून भव्य ग्रामपरिक्रमा सुरू होईल. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज, विविध आखाड्यांचे प्रमुख, महामंडलेश्वर, साधू-संत, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मोदी मैदान, तपोवन, पंचमुखी हनुमान, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, वीर सावरकर पथ, धुमाळ पॉइंट, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल आणि मालेगाव स्टँडमार्गे परिक्रमा रामकुंड येथे पोहोचेल. धर्मध्वज, कुंभरथ, साधू-संतांचे रथ, चित्ररथ, ढोल-ताशा व शंखनाद पथके, शौर्य पथके आणि पारंपरिक आदिवासी नृत्यपथके यात सहभागी होतील. महिला डोक्यावर कुंभकलश व तुळशीवृंदावन घेऊन सहभागी होणार आहेत. रामकुंड येथे महाआरतीने परिक्रमेची सांगता होईल.
दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज आणि आखाड्यांचे प्रमुख महंत यांच्या हस्ते महाध्वजारोहण व गोदाआरती होईल. भगव्या रंगाच्या आयताकृती महाध्वजावर सिंह, सूर्य, चंद्र, अमृतकुंभ, स्वस्तिक, ॐ आणि श्रीः ही धार्मिक प्रतीके आहेत. त्याग, वैराग्य, शौर्य, मंगलता आणि अमरत्वाचा संदेश देणार्या या ध्वजाला 12 रेशमी गोंडे आहेत. ते बारा राशी आणि संघशक्तीचे प्रतीक मानले जातात. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यात नाशिककर नागरिक, भाविक, साधू-संत व सर्व धर्मीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाध्वजाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आणि सिंहस्थ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरातील सर्व विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण होणार आहेत. नागरिकांची काही दिवस गैरसोय होऊ शकते; परंतु सर्वांनी शासनाला सहकार्य करावे. सर्वांच्या मदतीने आपल्याला
महाध्वजारोहण व कुंभमेळा यशस्वी करायचा आहे. – मनीषा खत्री, आयुक्त, मनपा
25 ऑक्टोबरला शंखनाद
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 25 ऑक्टोबर 2026 रोजी भव्य शंखनाद होईल. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा टपाल तिकिटाचे अनावरण, प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि संध्याकाळी गोदावरी आरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
तीन दिवसांचे धार्मिक कार्यक्रम
30 ऑक्टोबर : प्रायश्चित्त संकल्प, तीर्थपूजन, गणेशपूजन, जपग्रंथ व रुद्र स्थापना, स्नान आणि गोदावरी प्रार्थना.
31 ऑक्टोबर : सिंहस्थ महाध्वजारोहण, गोदाआरती, प्रतिष्ठापना हवन आणि महाआरती.
1 नोव्हेंबर : उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभृतस्नान, गोदाआरती आणि कर्मसमर्पणाने सोहळ्याची सांगता.
प्रशासकीय समन्वय व नियोजन
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, आखाडे व पुरोहित संघ यांच्यात समन्वय साधून वेगाने तयारी सुरू आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. भाविकांची सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक व गर्दीचे नियोजन आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.
पवित्र चिन्ह
ध्वजावर अमरत्व, मुक्ती व दैवीशक्तीचे प्रतीक असणारा अमृतकुंभ, विघ्नहर्ता गणेशाचे प्रतीक असलेले स्वस्तिक, सर्वव्यापकता दर्शवणारे ॐ आणि विजयाचे प्रतीक मानले जाणारे श्री: चिन्ह समाविष्ट आहे. या ध्वजाला असणारे 12 रेशीम गोंडे बारा राशी व बारा बाह्यांचे प्रतीक असून, ते सामाजिक एकता व संघशक्तीचे द्योतक आहेत. ध्वजाला असणारे घुंगरू व घंटी हे अंतर्नाद व ब्रह्मनादाचे प्रतीक आहेत.
Simhastha festival to commence on the 31st with the grand flag-hoisting ceremony.