सिन्नर ः प्रतिनिधी
भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधित्व करणार्या पत्रकारांचे समाजासाठी अमूल्य योगदान असून, जनकल्यानार्थ काम करणारा हा घटक मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे. अशा परिस्थितीत व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांसाठी आधार ठरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचा होत असलेला सन्मान सोहळा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे, असेे गौरवोद्गार प्रसिद्ध उद्योजक तथा श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरशेठ राठी यांनी काढले.
येथील पंचायत समितीच्या स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात व्हॉइस ऑफ मीडिया व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमच्या वतीने आणि श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
व्यासपीठावर नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य समन्वयक गोरखनाथ मदने, महिला विंग प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंखे, जिल्हाध्यक्ष शहर कपिल भास्कर, जिल्हाध्यक्ष
ग्रामीण बापू चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष अयुब शहा, महिला विंग राज्य संघटक पल्लवी शेटे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा व्हॉईस ऑफ मीडिया- व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम सिन्नर शाखेच्या वतीने सिन्नरचे वैभव श्री गोंदेश्वर प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह व श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने जॅकेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास भरत घोटेकर, बाळासाहेब
देशमुख, अक्षय गायकवाड, नवनाथ आव्हाड, संदीप ठोक, योगेश म्हाळणकर, नारायण आभाळे, भानुदास बैरागी, बाळासाहेब दराडे, दत्ता जोशी, दत्ता दिघोळे, नितीन शिंदे, रोशन पाटोळे, सुनील वाघ, लक्ष्मण पेंढारे, प्रवीण पवार, सागर महल्ले, ज्ञानेश्वर काकड, योगेश गुरुळे, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब सोनवणे, विकास दळवी व पत्रकार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील अभ्यासिकांसाठी सर्वतोपरी मदत
ग्रामीण भागात असलेल्या काही अभ्यासिका, सामाजिक सभागृहांची अवस्था बिकट असून अशा अभ्यासिकांच्या उद्धारासाठी श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्थेने काम हाती घेतले असल्याचे किशोरशेठ राठी म्हणाले. तालुक्यातील वडांगळी व किर्तांगळी येथील अभ्यासिकांमध्ये संस्थेने कामदेखील सुरू केले आहे. ग्रामीण भागातील अभ्यासिकांसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी प्रस्ताव पाठवावेत. संस्थेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राठी यांनी दिली.
पत्रकार भवनसाठी सहकार्य ः नगराध्यक्ष उगले
शहर आणि तालुक्यातील पत्रकारांची पत्रकार भवनासाठी जागेची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी दिली.
Sinnar receives journalist honor from Voice of Media