एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी सहा अटकेत

अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासह अधिकारी-कर्मचार्‍यांचा सहभाग

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)च्या औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) गट-ब परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासह एकूण सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एका उच्चपदस्थ अधिकार्‍याचा या पेपरफुटीत थेट सहभाग उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय वर्तुळात आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या
उमेदवारांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी तीन जण अधिकारी दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. यात मुख्य सूत्रधार मानले जाणारे आयोगाचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासह गोपाल मराठे आणि विश्वेश्वर नखाते या प्रमुख नावांचा समावेश आहे. परीक्षेची पारदर्शकता आणि गोपनीयता राखण्याची महत्त्वाची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनीच पदाचा गैरवापर करून पेपर फोडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबई पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
एमपीएससीतर्फे काही काळापूर्वी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील औषध निरीक्षक पदासाठी ही महत्त्वपूर्ण भरती परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेचा पेपर फुटल्याचा खळबळजनक आरोप विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय नेत्यांनी पुराव्यांसह वारंवार केला होता.
वाढता राजकीय दबाव,
उमेदवारांची तीव्र आंदोलने आणि सोशल मीडियावरील मोहिमांमुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली होती. याच तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि आर्थिक धागेदोरे जुळवत गुन्हे शाखेने थेट आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचून ही मोठी कारवाई पूर्ण केली.

पेपर कुणाकुणाला विकला

अप्पर सचिव लेंडवे आणि इतर आरोपींची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आयोगातील किंवा बाहेरील आणखी कोण-कोण सहभागी आहे, याचा शोध घेतला जात आहे. हा पेपर नेमका कुणाकुणाला विकला गेला, यामागे किती कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आणि या रॅकेटची पाळेमुळे कुठेपर्यंत पसरली आहेत, यावर आता गुन्हे शाखा लक्ष केंद्रित करत आहे. या अटकेमुळे पारदर्शकतेचा दावा करणार्‍या एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी गुन्हेगारांवर थेट कारवाई होत असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एक नाट्यमय लव्ह-हेट स्टोरी आली समोर

लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पद भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अमृत पाटील यांना यापूर्वी राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी एमपीएससीच्या तीन अधिकार्‍यांशी तब्बल 12 लाख रुपयांत पेपर खरेदीचा सौदा केला होता, ज्यातील पाच लाख रुपये त्यांनी अधिकार्‍यांना दिले होते.
या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणामागे एक नाट्यमय लव्ह-हेट स्टोरी समोर आली आहे. अमृत पाटील यांनी कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटील या दलालाच्या मदतीने 22 मार्चच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवली. ऋतुजाने प्रेमापोटी हा फुटलेला पेपर तिचा बॉयफ्रेंड गौरव पाटील ऊर्फ लोकेश याला दिला. निकाल जाहीर झाल्यावर ऋतुजा पाटील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. ऋतुजा आता अधिकारी होईल आणि आपल्यापासून दूर निघून जाईल या भीतीपोटी, तसेच लग्नाला नकार दिल्याच्या रागातून गौरवने थेट एमपीएससीकडे पेपर-फुटीची तक्रार केल्याची माहिती आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर गौरवने दुसर्‍याच दिवशी मी मुद्दाम बनाव रचला होता, असा ई-मेल करून तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि चौकशीची चक्रे फिरली होती. पोलिसांनी या प्रकरणात तक्रारदार गौरव पाटील आणि शिक्षकासह एकूण सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ऋतुजा पाटील हिला अद्याप अटक करण्यात आली नसून, पोलिसांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आता या पेपरफुटी सत्रामुळे दिवसरात्र अभ्यास करणार्‍या प्रामाणिक उमेदवारांचा संताप अनावर झाला आहे. आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

Six arrested in MPSC paper leak case.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *