खासगी कंपनीने बनवलेले ऑर्बिटल रॉकेट अंतराळात पाठवण्याची क्षमता असलेला जगातील भारत तिसरा देश बनण्याचा गौरव 18 जुलै 1926 रोजी भारताने प्राप्त केला. अमेरिका आणि चीनने यापूर्वी असे केले आहे.
ज्या कंपनीने हे कार्य करून दाखविले आहे, ती स्कायरूट एयरोस्पेस नावाची कंपनी अवघी आठ वर्षे जुनी असून, तिची सुरुवात कधीकाळी इस्रोचे शास्त्रज्ञ असलेल्या पवनकुमार चंदना आणि नागा भरत डाका या दोन मित्रांनी केली आहे. त्यांनी विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून दाखवून अत्यंत प्रेरणादायी इतिहास रचत भारताला या क्षेत्रात थेट अमेरिका व चीनच्या बरोबरीत उभे केले आहे. शनिवारी (दि. 18 जुलै 2026) सकाळी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर काउंटडाउन सुरू झाले. टी-मायनस 5 मिनिटांवर एक तांत्रिक बिघाड समोर आला आणि विक्रम-1 चे संपूर्ण लॉन्च थांबवण्यात आले होते. त्या नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या प्रत्येक इंजिनिअरसाठी ते 35 मिनिटांचे थांबणे कदाचित त्यांच्या आयुष्यातील सर्वांत लांब 35 मिनिटे होती. काही वेळानंतर पुन्हा काउंटडाउन सुरू झाले. दुपारी 12.05 वाजता एका रॉकेटने अवकाशात झेप घेतली, त्याचे नाव होते विक्रम-1 आणि या मिशनचे नाव होते ‘आगमन’. अवघ्या 15 मिनिटांत हे रॉकेट पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 450 किलोमीटर उंचीवर यशस्वीपणे प्रस्थापित झाले. एका उड्डाणासोबतच भारत एखाद्या खासगी कंपनीने तयार केलेले ऑर्बिटल-क्लास रॉकेट अंतराळापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असलेला अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरा देश बनला आहे.
स्कायरूट एयरोस्पेसचे संस्थापक पवनकुमार चंदना आणि नागा भरत डाका या दोघांनी आठ वर्षांपूर्वी घेतलेला एका धाडसी निर्णयाने ऐतिहासिक कामगिरी केली. या दोघांपैकी पहिले पवनकुमार चंदना यांनी आयआयटी खडगपूरमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर 2012 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मिळालेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर या अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी सुरू केली. सहा वर्षे ते तिथे अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत राहिले. तर दुसरे नागा भरत डाका हे आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असून, तेसुद्धा अनेक वर्षे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांची इस्रोमधील नोकरी सुरक्षित, सन्मानजनक आणि देशसेवेशी जोडलेली होती. बहुतेकांसाठी हे एका स्वप्नवत ध्येयासारखे असते. मात्र, 2018 मध्ये पवन यांनी ती सुरक्षित नोकरी सोडली.
या दोघांच्याही मनात एकच प्रश्न घोळत होता, तो म्हणजे “भारतात खासगी कंपनी रॉकेट बनवू शकते का?” त्यांनी नागा भरत यांच्याशी संपर्क साधला आणि दोघांनी मिळून एका पूर्णपणे नवीन आणि अनिश्चित वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. त्याची कंपनी स्कायरूटला सुरुवातीला पैशांची मोठी अडचण होती. या दोघांनी मिंट्राचे संस्थापक आणि आयआयटी खडगपूरचे माजी विद्यार्थी मुकेश बन्सल यांना थेट मेसेज पाठवला. पवन यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत मुकेश बन्सल यांनी सुरुवातीला 15 लाख डॉलर्सची (1.5 मिलियन डॉलर्स) गुंतवणूक केली. अशा प्रकारे हैदराबादमध्ये स्कायरूट एयरोस्पेसची सुरुवात झाली. स्कायरूटने 18 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारंभ मिशन अंतर्गत भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस 89.5 किलोमीटर उंचीपर्यंत यशस्वीपणे लॉन्च करत पहिले मोठे यश मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या घटनेचे वर्णन ऐतिहासिक क्षण असे केले होते. पण ही तर फक्त सुरुवात होती. ऑर्बिट (कक्षा) गाठण्याचे खरे आव्हान अजून बाकी होते. पुढील चार वर्षे स्कायरूटच्या पूर्ण टीमने अपार मेहनत घेतली. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबर 2025 ला हैदराबादमध्ये स्कायरूटच्या नवीन इन्फिनिटी कॅम्पसचे उद्घाटन केले. सुमारे दोन लाख स्क्वेअर फूटचा हा परिसर दरमहा एक ऑर्बिटल रॉकेट बनवण्याची क्षमता ठेवतो. स्कायरूटने आतापर्यंत टेमासेक आणि ब्लॅकरॉकसारख्या बड्या जागतिक गुंतवणूकदारांकडून 800 कोटींपेक्षा (सुमारे 95.5 मिलियन डॉलर्स) अधिक निधी उभारला आहे. कंपनी भारताची पहिली स्पेस-टेक युनिकॉर्न बनली आहे. आज त्यांच्या टीममध्ये सरासरी वय अवघे 28 वर्षे असलेले 350 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स आहेत. विक्रम-1 ची उंची 23 मीटर म्हणजेच सुमारे सात मजली इमारतीइतकी असून, व्यास 1.7 मीटर एवढा आहे. हे रॉकेट संपूर्णपणे स्टीलपेक्षा पाच पटीने हलके पण तितकेच मजबूत कार्बन-कंपोजिट रचनेने बनवलेले असून, 350 किलोग्रॅमपर्यंत पेलोड वाहून नेण्याची याची क्षमता आहे.
18 जुलैच्या ऐतिहासिक उड्डाणात हे रॉकेट आपल्यासोबत स्कायरूटचा स्वतःचा सॅटेलाइट, तसेच ग्रह स्पेस, कॉस्मोसर्व आणि डीक्यूब्डचे टेक्नॉलॉजी पेलोड्स घेऊन गेले. यामध्ये अंतराळातील कचरा साफ करणार्या रोबोटिक-आर्म तंत्रज्ञानाचाही समावेश होता. यासोबतच दोन अत्यंत प्रतीकात्मक गोष्टीही पाठवण्यात आल्या.
स्वतःची जागतिक ओळख निर्माण करणार्या या दोन मित्रांच्या या धाडसी निर्णयाची ही गोष्ट भारतीय तरुणांना धाडसी निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात खरे करण्याची प्रेरणा
देत आहे.
Skyroot’s Record