महापौर हिमगौरी आडके यांचा निर्णय
नाशिक : प्रतिनिधी
कत्तलखान्याच्या बांधकामासाठी प्रस्तावित असलेला सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी आता शहरातील प्रलंबित रस्ते, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत नागरी सुविधांसाठी वळविण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देत निधीचा विनियोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे प्रस्तावित कत्तलखान्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. भद्रकाली परिसरात कत्तलखाना आणि बीफ मार्केटच्या बांधकामासाठी महापालिका प्रशासनाकडून पाच कोटी रुपयांची ई-निविदा काढण्यात आली होती.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच दक्षिण काशी म्हणून नाशिक ओळखले जाते. शहराची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा तसेच नागरिकांच्या भावना लक्षात घेता त्यांना धक्का पोहोचविणारा कोणताही प्रशासकीय निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. प्रभाग 14 मधील भद्रकाली परिसरातील कत्तलखाना आणि बीफ मार्केटच्या प्रस्तावावरून आगामी काळात राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, महापालिका प्रशासन या निर्णयाची पुढील कार्यवाही कशी करते, याकडे लक्ष लागले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलेला असताना शहरातील विकासकामे आणि पायाभूत सुविधांसाठी निधीची आवश्यकता आहे.
पावित्र्याशी तडजोड नाही
नाशिकच्या पावित्र्याशी आणि नागरिकांच्या भावनांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नाशिकची सांस्कृतिक ओळख जपतानाच शहराचा विकास करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. कत्तलखान्यासाठी प्रस्तावित निधी नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी वापरण्यात यावा, असे महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी
स्पष्ट केले.
Slaughterhouse tender worth ₹5 crore cancelled.