गुलामी

इतिहासात आपण भारतीय, कितीक लोकांचे आणि किती वर्ष गुलाम होतो हे आता आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. आपण जरी प्रत्यक्ष गुलामी पाहिली नसेल तरी चित्रपट आणि साहित्य यांनी आपल्याला त्याचे वर्णन करून सांगितले आहे. आजही भारतात राजस्थानमध्ये थोड्याफार प्रमाणात गुलामी आहे, मुलींना लग्नात हुंडा म्हणून, दासी देण्यात येते हे मी स्वतः पाहिले आहे. ती वीस-बावीस वषार्ंची मुलगी, माझ्या एका राजस्थानी मैत्रिणींबरोबर हुंडा म्हणून आली होती. तिच्या पिढ्या यांच्याच घराण्याच्या गुलाम होत्या. पण ती मैत्रीण खूप सुधारवादी होती. तिने त्या मुलीला शिवणकाम शिकवले आणि एक शिवणक्लास उघडून दिला. त्यानंतर तिचे लग्न ही लावून दिले आणि तिच्या पिढीला या गुलामगिरीतून मुक्त केले. आज ती जगात नाही, पण त्या गुलाम मुलीचा उद्धार तिने केल्याने तिच्या पुढच्या पिढीपर्यंत तिची आठवण निश्चितच केली जाईल. आज मी ऐतिहासिक संदर्भात आज काहीच सांगणार नाही. आज वर्तमानात आपण कसे आणि कितपत गुलाम आहोत त्याबद्दल विचार करूयात.
आपण आज ज्या काळात जगत आहोत त्यात खूप खूप गोष्टींचे कळत नकळत अगदी भयानक गुलाम झालो आहोत. आपला सर्वांत प्रथम आणि मोठा मालक आहे मोबाइल आपल्या हातातल्या मोबाईल ला निरखून बघा. त्याचे निर्देश आपण तंतोतंत पाळतो. आपला नाइलाज असतो. मोबाइल सांगतो, हे करा, ते मुळीच करु नका, तुम्हाला असाच आहार घ्यायला हवा, त्याव्यतिरिक्त काही खाल्ल्यावर तुम्हाला अमुक रोग होण्याची शक्यता आहे. तुम्ही इतके वाजता झोपा आणि सूर्योदयापासून सातत्याने अशा क्रमाने कामं करा, असे कपडे वापरा, अमुक ब्रॅण्डचे कपडे, जोडे, सौंदर्य प्रसाधन वापरा. हा व्यायाम करा, हा पदार्थ असा रांधा.. आपण नुसता मोबाइल सुरू केला की आदेशांचा नुस्ता पाऊस पडत असतो.या टीचभरच्या यंत्राने आपल्या सर्वांनाच, स्वतःच्या इच्छेनुसार चालण्यास बाध्य केले आहे. आणि विशेष म्हणजे आपण खूप आनंदात, आपले श्रमाचे पैसे खर्चून हे ’मालक ’हाताळतो आहोत, त्याला जिवापाड जपतो आहोत आणि त्याची योग्य ती निगा राखतो आहोत. दुसरा मालक आहे ’पैसा’ धन हे असणे नसणे दोन्ही दुखदाई आहेत असे म्हणतात. पण सर्वांनाच आपल्या जवळ अपार धन असावे असे वाटत असते. जास्त पैसा आपल्याकडून बर्‍याच प्रमाणात चांगल्या गोष्टी करवून घेत असला तरी वाईट गोष्टी ही करवतो. आणि पैशाची कमतरता अनेकवार खूप वाईट कामं करवते हा अनुभव बर्‍याच जणांना आला असेल. पैसा कमवून खिशात ठेवतात पण त्याचबरोबर तो आपला मालक असतोच. मनातील इच्छा तोच पुरवतो, पण नसल्यास तो गुन्हे ही घडवू शकतो. पैसा काहीही करवू शकतो असे फुकटात नाही म्हणत. कारण आपण त्याचे गुलाम आहोत.
जाहिरातींच्या या दुनियेत आपण अनेक वेळेस गडबडून जातो. प्रत्येक ब्रॅण्ड त्याचीच गुलामी करा हा हट्ट धरून असतो. कपड्याचे अफाट ब्रॅण्ड, जोडे, सौंदर्य प्रसाधन, खाण्याचे, हॉटेल्सचे ब्रॅण्ड, खेळाचे साहित्य, नाभिकाच्या ब्रॅण्डपासून ते कशाकशाचे नाहीत. हे ब्रॅण्ड आणि त्यांचे आकर्षक आग्रह. पुष्कळ तर आपल्याला माहीतसुद्धा नाहीत. महानगरातून तर इतके नवे ब्रॅण्ड दिसतात की, आपण परदेशात आहोत की काय असे वाटू लागते. आजची तरुण पिढी हे नवनवीन ब्रॅण्डचे गुलाम आहेत. त्यांना सर्व नवीन संशोधित ब्रॅण्ड वापरायची घाई असते. गर्भश्रीमंत लोक नेहमीच अशा नवीन आणि महागड्या वस्तू वापरतात. त्याशिवाय परदेशी ब्रॅण्डही आता भारतात मिळतात आणि इंग्रज आपला देश सोडून गेले असले तरीदेखील आपल्या अनेक वस्तू भारतात, त्यांच्या गुलामीचे प्रतीक म्हणून सोडून गेले आहेत. अनेक शब्द, भाषा, रहाणीमान, मानसिकता खाद्यपदार्थ याचे आपण आजही गुलाम आहोत. मनाला आणि विचारांना गुलामगिरीतून काढणे फारच अवघड काम आहे. कितीक भारतीयतेचा आव आणला, सभ्यता आणि संस्कृतीचा हवाला दिला तरी आपण आतून गुलाम आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि उत्तर शोधावे. लहानपणापासून आपले बरेच मालक असतात. समजावणारे, शिकवणारे, संगोपन करणारे आणि खुद्द जन्मदाते. लहानपणी हे गृहीत धरूनच असतो की, आपण सर्वांचेच ऐकायचे. बराचवेळ मुलं ऐकतात आणि त्यानंतर स्वतःचेच करतात. हे चांगले मालक आपण लवकरच त्याच्या पदावरून काढून टाकतो, पण हे इतर मालक जे पूर्ण आयुष्य भर, त्यांची हुकूमशाही आपल्यावर चालवतात, त्यांच्यावर आपला काहीच जोर नसतो. त्यांचे आपण गपगुमान ऐकतो कारण हे मालक खूप जणांचे असतात, ते अनेकांवर हुकुमत करतात, आपल्या इच्छेनुसार चालवतात. आपल्या घरात जर कुणी बाहेरच्यांनी येऊन अधिकार गाजवला तर आपल्याला चालेल काय? आपण हेच म्हणू की, ’तू काय मालक आहेस की काय आमचा?’ पण हेच शब्द आपण अनेक लोकांना म्हणू शकत नाही. नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍यांना, शाळेतील शिक्षकांना, आपल्या राजनेत्यांना, आमदार खासदारांना, समाजसुधारक आणि सल्लागारांना. अनेकवार दुकानदार, डॉक्टर, वकील हे लोकसुद्धा आपला मानस जखडून टाकतात, आपल्याला स्वतःचा गुलाम करतात. काही गोष्टींवर आपणच त्यांच्यावर अवलंबून असतो. किंबहुना आपली सवयच होत जाते. गुलामगिरीची आणि माणूस त्यांचे ऐकतच राहतो. गुलामगिरीचे हे मानेवरचे ’जू’ आपण काढून फेकू शकत नाही. हे जन्मानंतर आपल्या मानेवर बसवण्यात येते आणि संपूर्ण आयुष्य आपण याला मानेवर जोपासत राहतो, एकदा औताच्या बैलाला मोकळे होता येते, पण आपण त्याला कधीच उतरवून फेकण्याचा विचार करत नाही. पूर्वी गुलामीची प्रथा होती. माणसे पिढीजात गुलाम असायची. राजे, बादशाह यांना नेहमीच गुलाम लागायचे. ते सर्व कामे करायचे. आज ती प्रथा खरोखर बंद झाली आहे काय? गुलामी संपली आहे का? हातातल्या मोबाइलला हा प्रश्न विचारून पाहा…!

Slavery

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *