उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाचे ‘स्मार्ट प्लॅनिंग’; 60 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट
सिन्नर : प्रतिनिधी
आगामी खरीप हंगाम 2026-27 साठी सिन्नर तालुका कृषी विभागाने महत्त्वाकांक्षी कृषी आराखडा तयार केला असून, यंदाही तालुक्यात सोयाबीन आणि मका या पिकांचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सन 2025-26 मध्ये तालुक्यातील 63 हजार 163 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 60 हजार 828 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. त्यात सर्वाधिक 36 हजार 001.50 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. मक्याखाली 17 हजार 645 हेक्टर क्षेत्र होते. यंदा कृषी विभागाने मक्याचे क्षेत्र वाढवत 20 हजार 100 हेक्टरचे नियोजन केले असून, प्रतिहेक्टरी 6 हजार किलो उत्पादनाचे लक्ष्य
ठेवले आहे.
सोयाबीनसाठी यंदा 33 हजार 363 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, उत्पादकता 2 हजार 134.50 किलोवरून 2 हजार 450 किलो प्रतिहेक्टरीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. भातासाठी 1 हजार 350 हेक्टर क्षेत्र निश्चित करत उत्पादन 2 हजार 531 किलोवरून 2 हजार 700 किलो प्रतिहेक्टरीपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.
कडधान्य क्षेत्रातही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गतवर्षी तुरीखालील केवळ 157 हेक्टर क्षेत्र होते. यंदा ते 210 हेक्टरपर्यंत वाढवण्यात येणार असून, उत्पादकता 678 किलोवरून 850 किलो प्रतिहेक्टरीपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुगासाठी 215 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, 830 किलो प्रतिहेक्टरी उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. भुईमुगासाठी 2 हजार 550 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, उत्पादकता 1 हजार 350 किलो प्रतिहेक्टरीपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला
जाणार आहे.
गतवर्षीच्या प्रत्यक्ष पेरणीचा आढावा घेऊन कृषी विभागाने यंदा क्षेत्रवाढीसह प्रतिहेक्टरी उत्पादकता वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. योग्य पाऊस, आधुनिक तंत्रज्ञान आणि संतुलित खत व्यवस्थापन केल्यास यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामानानुसार पेरणीचे नियोजन
शेतकर्यांनी दर्जेदार बियाणे, संतुलित खतांचा वापर, सूक्ष्म सिंचन आणि हवामानानुसार पेरणीचे नियोजन करावे. वेळेवर मान्सून सक्रिय झाल्यास खरीप हंगाम शेतकर्यांसाठी समाधानकारक राहील.
– ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर
2026-27 साठी प्रस्तावित उद्दिष्ट व उत्पादकता
पीक उद्दिष्ट लक्ष्यित उत्पादकता
क्षेत्र (हे.) (कि./हे.)
भात 1350 2700
बाजरी 2800 1500
मका 20100 6000
तूर 210 850
मूग 215 830
भुईमूग 2550 1350
सोयाबीन 33363 2450
कापूस 150