सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक – पुणे महामार्गावर पेट्रोल पंपाच्या आडोशाला सुरू असलेल्या स्टील चोरीच्या गोरखधंद्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी जोरदार हातोडा मारला आहे. माळेगाव एमआयडीसीतून निघालेल्या स्टीलच्या ट्रेलरमधील माल चोरताना पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी सूत्रधारासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात 48 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली 3 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुरेवाडी फाट्याजवळील द्रोपदी (एचपी) पेट्रोल पंपाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत ट्रेलर उभा करून त्यातून स्टील (आसारी) उतरवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अचानक छापा टाकताच सहा जण ट्रेलरमधून स्टीलचे रॉड खाली उतरवत असल्याचे दिसले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला. अंधाराचा फायदा घेत आठ जण पसार झाले. मात्र, समीम बैतुल्ला खान (वय 31, रा. अंबड, नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, अरुण भिसे, प्रमोद मंडलिक, शंकर साबळे, सुनील बर्वे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
या छाप्यात अशोक लेलंड कंपनीचा स्टीलने भरलेला ट्रेलर (47.75 लाख रुपये) तसेच 1520 किलो वजनाचे स्टील रॉड (76 हजार रुपये) जप्त करण्यात आले. घटनास्थळी ‘भगवती स्टील कास्ट’ कंपनीचे बिल व वजन पावत्याही मिळून आल्या. तपासात निसार अहमद इस्लाम खान ऊर्फ ‘प्रधान’, त्याचा मुलगा साहेब आलम खान ऊर्फ ‘सब्बू’ आणि अल्ताफ चौधरी हे या चोरीच्या रॅकेटचे सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ट्रेलरचालक सद्दाम याने कंपनीचा विश्वासघात करून माल चोरीच्या उद्देशाने पेट्रोल पंपाच्या मागे उभा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नऊ जणांवर गुन्हा
याप्रकरणी फिर्यादी सुशांत मरकड यांच्या तक्रारीवरून सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात समीम खान, निसार खान, साहेब आलम खान, अल्ताफ चौधरी, चिन्नू, मुल्ला, यादव, अहमद आणि चालक सद्दाम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 316 (3), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Steel theft racket exposed on highway; Goods worth Rs 48 lakh seized