पानमसाल्याचा 19.39 लाखांचा साठा जप्त

बोलेरो पिकअपसह मुद्देमाल हस्तगत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाल्याची वाहतूक करून विक्री करण्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नायगाव रोडवरील शिंदे परिसरात छापा टाकून विमल आणि राजनिवास या ब्रँडचा पानमसाला जप्त केला.
या कारवाईत पानमसाल्याच्या साठ्यासह महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 19 लाख 39 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी राज इलियास सय्यद (वय 38, रा. नायगाव रोड, शिंदे) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित पानमसाल्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांच्यासह पथकाने 11 ऑक्टोबर रोजी रात्री 1.15 वाजता कडवा पाट, नायगाव रोड परिसरात कारवाई केली. यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनामध्ये विक्रीसाठी वाहतूक केला जात असलेला पानमसाला आढळून आला. पथकाने परिसरातील गोदामाचीही तपासणी केली; मात्र तेथे प्रतिबंधित पानमसाल्याचा साठा आढळला नाही. प्रतिबंधित पानमसाल्याची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी केवळ वाहतूकदारांवर कारवाई करून चालणार नाही, तर मालाचा पुरवठा करणारे आणि त्याची विक्री करणार्‍यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून प्रतिबंधित पानमसाल्याच्या पुरवठा साखळीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

11 लाखांचा पानमसाला, आठ लाखांचे वाहन

कारवाईदरम्यान विमल पानमसाल्याची 200 पाकिटे, ज्यांची किंमत 39 हजार 600 रुपये आहे, तसेच राजनिवास पानमसाल्याची एकूण 8 हजार 800 पाकिटे जप्त करण्यात आली. त्यापैकी 4 हजार 400 पाकिटांची किंमत सहा लाख रुपये, तर उर्वरित 4 हजार 400 पाकिटांची किंमत चार लाख 40 हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे पानमसाल्याच्या साठ्याची एकूण किंमत 11 लाख 39 हजार 600 रुपये असून, आठ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहनही जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाचे मूल्य 19 लाख 39 हजार 600 रुपये आहे.

गुजरातमधून पुरवठा झाल्याची माहिती

जप्त केलेल्या पानमसाल्याच्या खरेदीची बिले अधिकार्‍यांनी मागितली असता ती उपलब्ध नसल्याचे वाहनमालकाने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच हा साठा गुजरातमधून आणल्याची माहितीही त्याने दिल्याचे समजते. त्यामुळे प्रतिबंधित पानमसाल्याचा मूळ पुरवठादार कोण, हा माल नाशिकमध्ये कोणाला विक्रीसाठी आणला होता आणि त्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा तपास महत्त्वाचा
ठरणार आहे.

Stock of Pan Masala worth ₹19.39 lakh seized.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *