मुक्त विद्यापीठातर्फे ‘विद्यार्थी व युवा संवाद’ कार्यक्रम

कौशल्याधारित शिक्षण घेऊन प्रगती साधावी : कुलगुरू प्रा. सोनवणे

नाशिक : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने केटीएचएम महाविद्यालय, नाशिक येथील अभ्यासकेंद्रात ‘विद्यार्थी व युवा संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवारी (दि. 30 ऑगस्ट) महाविद्यालयातील व्ही.एल. सी. सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून बदलत्या शैक्षणिक प्रवाहांसह भविष्यातील आव्हाने व उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी सांगितले की, वाढत्या स्पर्धेच्या युगात केवळ पारंपरिक शिक्षण व पदवी संपादनावर समाधान न मानता विद्यार्थ्यांनी काळानुरूप आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्ये, तंत्रज्ञान आणि नव्या ज्ञानाचा सातत्याने अंगीकार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (एनईपी-2020) मुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता व गरजेनुसार विविध विषयांचे तसेच कौशल्याधारित शिक्षण घेण्याच्या व्यापक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. नोकरी, व्यवसाय किंवा अन्य जबाबदार्‍या सांभाळून शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुक्त व दूरस्थ शिक्षणव्यवस्था उपयुक्त व प्रभावी माध्यम ठरत असल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांचा विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तरुणांनी केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न राहता कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणारे बनावे, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर आयोजित ‘विद्यार्थी व युवा संवाद’ सत्रात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020, उच्च शिक्षणातील बदल, कौशल्याधारित शिक्षण, करिअरच्या विविध संधी, तसेच मुक्त विद्यापीठातील विविध शिक्षणक्रम यासंदर्भात प्रश्न व शंका उपस्थित केल्या. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांंना समर्पक, सकारात्मक व मार्गदर्शक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच विद्यापीठ गीताने झाली. नाशिक विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. एस. आर. निकम यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची आवश्यकता, उद्दिष्टे व रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांनी केले. डॉ. सतीश हांडगे यांनी आभार मानले. ‘वंदे मातरम’ गायनाने कार्यक्रमाची
सांगता झाली.

‘Student and Youth Dialogue’ program organized by the Open University

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *