आंदोलनाचा इशारा : मालेगाव-वळवाडे मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव आगाराची मालेगाव-वळवाडे मुक्कामी बस अचानक बंद केल्याने वळवाडे परिसरातील प्रवासी व विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ नियमितपणे चालणारी ही मुक्कामी बस कोणतेही ठोस कारण न देता काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. मात्र, वळवाडे ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच उपसरपंच नानाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्यानंतर ही बस पुन्हा सुरू झाली; परंतु तिची वेळ व मार्ग पूर्णपणे चुकीची ठरविण्यात आल्याने प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही.
पूर्वी सायंकाळी सात वाजता मालेगावहून सुटणारी ही बस आता सायंकाळी पाच वाजताच सुरू करण्यात आली आहे. ती थेट मालेगाव- वळवाडे मुक्कामी न जाता मालेगावहून नामपूरकडे वळविण्यात आली आहे. परिणामी वळवाडेसाठी थेट तिकीट मिळत नसून प्रवाशांना वडनेर येथे उतरावे लागते. त्यानंतर ही बस 15 किलोमीटर नामपूरकडे जाऊन पुन्हा 15 किलोमीटर वडनेरकडे परत येते. या अनावश्यक फेर्यांमुळे वळवाडेकडे जाणारे प्रवासी कंटाळून खाजगी वाहनांचा आधार घेतात. शेवटी ही बस वडनेरहून केवळ चार किलोमीटर अंतरावरील वळवाडे येथे मुक्कामी जाते. अशा विचित्र, अव्यवहार्य मार्गामुळे बसचा नियमितपणा ढासळला आहे. प्रवासीसंख्या कमी-जास्त होत आहे. याचाच आधार घेत आगारप्रमुख ‘प्रवासी कमी मिळत आहेत,’ असे कारण पुढे करून बस बंद करण्याचे समर्थन करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून ही बस पुन्हा अचानक बंद करण्यात आल्याने वळवाडे परिसरातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. दररोज सकाळी मालेगाव येथे शाळा-महाविद्यालयांसाठी ये-जा करणार्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. बाहेरगावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी गेलेल्या ग्रामस्थांना गावी परतण्यासाठीही ही मुक्कामी बस अत्यंत उपयुक्त आहे. सकाळी लवकर तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार्या नागरिकांसाठीही ही बस अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे मालेगाव आगाराने तात्काळ मालेगावहून सायंकाळी 7 वाजता वडनेरमार्गे थेट वळवाडे मुक्कामी बस सुरू करावी.
नामपूरकडे जाऊन पुन्हा मागे येणारा अव्यवहार्य व जगावेगळा मार्ग रद्द करून सरळ व नियमित सेवा द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आगार व्यवस्थापनाने आमचा अंत पाहू नये. डेपो मॅनेजरच्या केबीनमध्ये ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ही मागणी उपसरपंच नानाभाऊ राऊत यांच्यासह गंगाधर देशमुख, युवराज सोनवणे, घनश्याम आहिरे, किशोर देशमुख, रमेश पाटील, राधेश्याम पवार, सतीश भामरे, शरद देशमुख, केशव पवार व नामदेव देशमुख यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले वळवाडे हे मालेगाव तालुक्यातील एकमेव असे गाव आहे जिथे दिवसभरात एकही बस ये-जा करत नाही. ग्रामस्थांनी यापूर्वी सकाळी 10 वाजता व सायंकाळी 5 वाजता किमान एक-एक फेरी सुरू करण्याची वारंवार मागणी केली. मात्र, आगार प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आता असलेली एकमेव मुक्कामी बसही अशा चुकीच्या मार्गावर चालवून बंद ठेवण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गेल्या 30 वर्षांपासून ही बस नियमित सुरू होती. मात्र, कोणतेही ठोस कारण नसताना ती बंद करण्यात आली. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बस पुन्हा सुरू झाली खरी, पण तिची वेळ व मार्ग पूर्णपणे चुकीचा ठेवल्यामुळे प्रवाशांना काहीच उपयोग होत नाही. बस तत्काळ थेट व नियमित सुरू करावी, अन्यथा ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल. – नानाभाऊ राऊत, उपसरपंच, वळवाडे
Students, passengers suffer; Bus service suddenly stopped
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…