सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी (सुंदरपूर) शिवारात विहिरीतील पाण्यात पडून उपसरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे नाव अशोक खंडू डावखर (50, रा. सुळेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे आहे. दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6.30 ते 10.30 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब शिवराम डावखर यांच्या शेत गट क्रमांक 765 मधील विहिरीत अशोक डावखर हे पडल्याचे समोर आले. याबाबत मयताचा भाऊ अरुण खंडू डावखर (43) यांनी पोलिसांना खबर दिली. विहिरीतील पाण्यात पडल्याने नाकातोंडात पाणी गेल्यामुळे अशोक डावखर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सिन्नर येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सुळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.