संडे अँकर
तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाने उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खडबडून जागी झाली आहे. या पक्षाचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. त्यातल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबाद आणि नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मजबूत बांधणी केली होती. नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले तेव्हा ‘आई जगदंबे दार उघड’, असे आर्जव करण्यात आले होते. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. सन १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेनेला राज्यात ४० वर्षांनी प्रथमच सत्ता मिळाली. त्यावेळी शिवसेनेचा प्रतिस्पर्धी हा काँग्रेस पक्ष होता. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पार पडलेल्या या पक्षाच्या निर्धार शिबिराला महत्व प्राप्त झाले होते. पण, आता शिवसेनेचे खरे प्रतिस्पर्धी म्हणजे भाजपा आणि शिवसेना (शिंदे) हे पक्ष आहेत. शिवसेनेने महाराष्ट्रात मोठा केलेला भाजपा आणि आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवावर मोठे होऊन पक्षात फूट पाडून स्वतंत्र चूल बांधून बसलेली शिंदेंची शिवसेना यांच्याशी दोन हात करण्याची वेळ बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर आली असून, तिची कमान उध्दव ठाकरे यांच्या हाती आहे. बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा आई जगदंबेला साकडे घालण्यात आले. पण, गेल्या अनेक वर्षांत गोदावरीतून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या तीन वर्षांत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होत्याची नव्हती झाली आहे. पूर्वीच्या शिवसेनेचे स्वरुप आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आर्टिफिशियल इंटेलेक्चुअल-एआयद्वारे (कृत्रिम बुध्दिमत्ता) खुबीने शिबिरात वापर करण्यात आला. शिबिरात बाळासाहेब ठाकरे संवाद साधत असल्याचे हुबेहुब चित्र निर्माण करण्यात आले. शिवसैनिकांनी मरगळ झटकून पेटून उठावे, याचसाठी बाळासाहेब ठाकरे यांना शिबिरात उभे करण्यात आले.
हाताशी असलेले सरदार
शिवसेना हा काही केडरबेस्ड पक्ष नाही, तर मासबेस्ड पक्ष असल्याने शिबिरात जे काही मंथन झाले ते विद्यमान राजकीय परिस्थिती, हिंदुत्व आणि गद्दार या मुद्यांवर. यापेक्षा वेगळे खाद्य उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे दिसले नाही. शिवसेना म्हटली, तर नेत्यांची एक मोठी फौज उभी राहायची. पण, आता नाव घ्यावे, असे काही नेते काही राहिलेले नाहीत. उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे प्रमुख नेते. याशिवाय राजन विचारे (ठाणे), विनायक राऊत (कोकण), अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे (मराठवाडा), अरविंद सावंत (मुंबई) हेच काही नेते नाव घेण्यासारखे राहिले आहेत. त्यांचाच सहभाग शिबिरात होता. नाशिक शहर-जिल्ह्यातून नाव घेण्यासारखे फार कमी नेते राहिले आहेत. सुनील बागूल, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, वसंत गिते, डी. जी. सूर्यवंशी, दत्ता गायकवाड, बबनराव घोलप, खा. राजाभाऊ वाजे, भारती ताजनपुरे अशी काही नावे घेण्यासारखी आहेत. यातील काही मंडळी वयस्कर झाली आहेत. हाताशी आहे त्या सरदारांच्या बळावर आणि भरवशावर शिवसेना नव्याने उभी करण्याचा उध्दव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. याच अनुषंगाने शिबिर घेण्यात आले.
भाषणात नवीन काय?
पक्षप्रमुख या नात्याने उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांची भाषणे नेहमीच्या शैलीत होती. भाजपाचे आणि संघाचे हिंदुत्व कसे फसवे आहे आणि शिवसेनेचे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून आलेले राष्ट्रीय हिंदुत्व आहे, हेच ठाकरेंनी सांगितले. त्यांनी जे काही सांगितले तेच यापूर्वी अनेकदा सांगून झाले आहे. त्यात नावीन्य काही नव्हते. याशिवाय ‘गद्दार’ हा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला. शिवसेनेच्या जिवावर भाजपा महाराष्ट्रात मोठा झाला हेही पुन्हा एकदा सांगण्यात आले. भाजपाने हिंदुत्ववादी नसलेल्या तेलुगू देसम (चंद्राबाबू नायडू), जनता दल युनायटेड (नितीश कुमार) अण्णा द्रमुक (पलानीस्वामी) पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (मेहबुबा मुफ्ती) यांच्याशी युती केली. हे पक्ष हिंदुत्ववादी आहेत काय? असा सवाल करुन आमच्या हिंदुत्वाविषयी शंका घेऊन नका, असे सांगितले. प्रश्न हाच की, हेच मुद्दे कितीदा भाषणात आणायचे. दुसरीकडे वक्फ विधेयकाविषयी शिवसेनेची भूमिका ठाकरे यांनी स्पष्ट करताना भाजपाने ज्या पक्षांशी युती केली ते धर्मनिरपेक्ष आहेत काय? हा सवाल उपस्थित केला. संघात राष्ट्रवादी मुस्लिमांना घेणार, असे सरसंघचालक भागवत म्हणाले. यावर पंतप्रधानाच्या नावाने देशातील ज्यांना सौगत देण्यात आली ते मुस्लिम राष्ट्रवादी असल्याचे तुम्ही कसे ठरविले? हा बिनतोड सवाल केला. काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष का केला नाही? हा सवाल पंतप्रधानांनी केला. यावर दलित व्यक्तीला तुम्ही सरसंघचालक करणार काय? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला. याव्यतिरिक्त ठाकरेंच्या भाषणात नवीन काही नव्हते. राजभवनाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधा आणि शिवजयंतीला राष्ट्रीय सुटी जाहीर करा, अशा काही मागण्या त्यांनी केल्या. उध्दवजींनी आपली आणि आपल्या पक्षाची जी पूर्वी भूमिका होती ती मांडली. आदित्य ठाकरे यांनीही हेच मुद्दे वेगळ्या पध्दतीने मांडले. यातून शिवसैनिकांचे नव्याने प्रबोधन झाले, असे गृहीत धरायला हरकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्टिफिशियल आवाजातील भाषण जुन्या शिवसेनेची आठवण करुन देणारे होते. या भाषणातही भाजपा महाराष्ट्रात शिवसेनेमुळे मोठा झाल्याची आठवण करुन देण्यात आली. याशिवाय शिवसेना संपणार नाही, हा एक संदेश दिला जात असताना नकली शिवसेना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आणि सावरकरांच्या कडव्या हिंदुत्वाची आठवण करुन देण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ऐकून उपस्थितांमध्ये जोश निर्माण झाला. पण, पुढे शिवसैनिक कामाला लागले पाहिजेत.
नवीन कार्यक्रम काय?
विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचा अजिबात विश्वास नाही. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणुका जिंकल्या हेच उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अन्य नेत्यांनी अधोरेखित केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातही हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला. निवडणूक निकालापासून हाच मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. भाजपाची बूथ व्यवस्थापन पध्दतीचा शिवसेनेने सूक्ष्म अभ्यास केल्याचे शिबिरात दिसून आले. तीच पध्दत आपल्याला वापरावी लागेल, असे सूचित करुन भाजपाची कॉपी करायचे ठरविण्यात आले. भाजपापेक्षा वेगळी रणनीती काय? याचा शोध आणि बोध घेण्यात आला नाही. भाजपाची यंत्रणा गुप्तपणे काम करत होती. तशी गुप्त यंत्रणा उभी करण्याचा उध्दव ठाकरे प्रयत्न करणार की नाही? हा प्रश्न आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांना कोणता कार्यक्रम देण्यात आला? हे काही दिसत नाही. भाजपा, संघ, गद्दार, केंद्र व राज्य सरकार यांच्यावर नेहमीप्रमाणे करण्यात आलेल्या टीकेतूनच शिवसैनिकांनी लोकांसमोर जाऊन पक्षाची भूमिका मांडावी, हीच अपेक्षा शिबिरात व्यक्त करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…