निफाड : तालुका प्रतिनिधी
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये पाचशे रुपये दराच्या तब्बल 47 बनावट नोटा जमा करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी संशयित आरोपी संदीप रंगनाथ निकम (रा. फ्लॅट क्रमांक ए-13, माधव पार्क अपार्टमेंट, दामोदरनगर, पंचक, जेलरोड, नाशिक) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी प्रणिता सुगावकर यांनी दि. 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
निफाड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे उपव्यवस्थापक हेमंत अशोकराव पाटील यांनी याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बँकेच्या सी.डी.एम. मशिनमध्ये जमा झालेल्या संशयास्पद नोटांची तपासणी करताना पाचशे रुपये दराच्या एकूण 47 नोटा आढळून आल्या होत्या. दि. 18 नोव्हेंबर रोजी बँकेच्या सी.डी.एम. मशिनमधील व्यवहारांची तपासणी केली असता, बनावट नोटा जमा झालेल्या व्यवहाराशी संबंधित खाते क्रमांक निष्पन्न झाला. हा खाते क्रमांक संदीप रंगनाथ निकम याच्या नावावर असल्याचे बँकेच्या नोंदीतून समोर आले. संबंधित खाते नाशिक रोड येथील जेलरोड शाखेतील संरक्षण निवृत्तिवेतनधारक खाते असल्याची माहितीही तपासात पुढे आली. बँकेच्या व्यवहार तपासणीत संशयिताच्या खात्याशी संलग्न एटीएम कार्डचा वापर करून दि. 3 नोव्हेंबर रोजी निफाड एसबीआय शाखेच्या सी.डी.एम. मशिनमध्ये पाचशे रुपयांच्या 47 बनावट नोटा जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ करीत आहे.
Suspect in NIFAD fake currency case remanded in custody till November 27