स्वप्नांचा कारभारी

कितीतरी कटकटी असतात रोजच्या आयुष्यात. वयोमानानुसार आपणही त्याचे अभ्यस्त होऊ लागतो. म्हणतात ना ‘नित्य मरे त्याला कोण रडे’, तर रोजच कुठे पाणीटंचाई, कुठे वीजकपात, कुठे लहानथोर आजारपणं, कुठे लग्नसमारंभ, कुठे कुणी वारलं…., एक ना दोन. सांसारिक चक्रात एकदा का अडकले की मग सुटकाच नाही राव. त्यात येणार्‍या प्रत्येक संकटातून निघून सुरळीत पार होईस्तोवर गरागरा फिरतच रहावं लागतं.
संस्कृत भाषेत एक श्‍लोक आहे, संसार जाल पतितस्य जग्निवास। पापी लोकांचे पाप त्यांनी इथेच भोगावे म्हणूनच त्यांना इथे पुन्हा जन्म दिला गेला आहे. या संसाराच्या जाळ्यात गुरफटून ही पापं संपेस्तोवर भोग भोगायचे आहेत. ते तुम्ही कसे भोगाल याची व्यवस्थाही जगत्नियत्याने करून ठेवली आहे. कुणी आनंदात जगतंय, कुणी रडत खडत जगतंय, कुणी सतत तक्रार करतंय, कुणी आपला विरंगुळा शोधून त्यातच आनंदून जातंय. म्हणजे नानाविध युक्त्या करून आपल्याला जगावं मात्र लागतंच. आध्यात्मिक गुरू म्हणतात ‘हे जग मिथ्या आहे. इथले सर्व घटक नश्‍वर आहेत. याच्या मोहात पडू नका. ईश्‍वर स्मरणात मग्न रहा…..तोच एक त्राता आहे हेे आहे खरं, पण दैनंदिन जीवनाचं काय? त्याला लागणार्‍या मूळ गरजा पूर्ण कशा होतील? त्या सर्व पूर्ण करायला श्रम करावेच लागणार. अर्थार्जन करायला आधी आपली तयारी असावीच लागते. ती म्हणजेच शिक्षण, अनुशासन, सुरक्षाविषयक समज आणि सामाजिक संपर्कातून भोवतालची हितकारक आणि अहितकारक मंडळींना ओळखायची समज. जगणं म्हणजेच तारेवरील कसरतच म्हणा. कित्येक अडथळे, किती संघर्ष, प्रतिस्पर्धा, त्यात आणखीन भर म्हणून कौटुंबिक जीवनात येणारे असंख्य प्रश्‍न, मानापमान, कुणाच्याच भावनांना न दुखावत आपले साध्य साधता येणं……बाबारे किती किती त्रास सहन करत जगतो आपणं. खरंतर रोजच उठल्यावर गेला दिवस पार पाडण्यासाठी स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी म्हणजे आजचा दिवस पार पाडायला आयतीच ऊर्जा मिळेल. आजकाल एक नवीनच बदल झालाय, तो तो म्हणजे ‘मोटिव्हेशन’ आपल्यातलेच काही वाक्चतुर लोक उत्साह वर्धक भाषणं देतात. आपल्यात जगण्याची ऊर्जा भरायला छान छान उदाहरणं देऊन आपल्या दैनंदिन कटकटीपासून आपल्याला परावृत्त करतात. एक खूप मोठा वर्ग त्यांना ऐकतो.
माझ्या एका मित्राचा इथे उल्लेख करावासा वाटतो. हा मित्र डॉक्टर आहे जेव्हा त्याची नेमणूक गावात झाली तेव्हा हा तिथे पोहोचला. गावचं वातावरण गावाला साजेसं असंच होतं. शेतकरी, लहान व्यापारी, छोटासा बाजार आणि स्वतःची जास्त काळजी न करणारे लोक. डॉक्टर तिथे रुजू झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की ही माणसं सक्षम आहेत, कार्यकुशल आहेत, मेहनतीत कमी नाहीत पण स्वतःबद्दल फारच उदासीन आहेत. हातातोंडाची नियमित कटकट सोडली तर त्याच्या आयुष्यात इतर कुठल्याच बाबतीत मुळीच उत्साह नाही. डॉक्टरांनी कुणाचाही उपचार करताना हळूहळू बडबड करायला सुरुवात केली. अरे वा लवकर पूर्ण बरं होऊन मग काय मस्त मस्त फिरायला बाहेर जाणार नाही का? छान छान. शेतात नवीन प्रयोग करणार, भरघोस पीक घेणार. मज्जा आहे बुवा. कुणा तरुणाला प्रसन्न करायला दोन-तीन वाक्य पुरेसे होत असत. आपल्या दुखण्याला थोड विसरून तो डॉक्टरांच्या गप्पांत सामील व्हायचा. ‘यंदा पीक मनासारखं नाही आलं.’ म्हणणार्‍यांना ते भरघोस पिकाच्या अतोनात नुकसानातून वर येणार्‍यांची उदाहरणं देऊन त्यांना समजावून सांगत असत की, हे नुकसान तर काहीच नाही, यापेक्षाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकर्‍यांनी धीर सोडला नाही आणि ते आज लाखो रुपये कमावताहेत. अरे कामात संकट येणारच पण खचून चालणार नाही. नवतरुणांना ते शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असत आणि शहरात लोक प्रगतीपथावर कसे धावत आहेत हे सांगत असत.
प्रत्येक माणूस सातत्यानं स्वप्नं पाहत असतो. ही स्वप्नं पूर्ण होतील की नाही याचा फारसा विचार न करतादेखील तो स्वप्न बघणं सोडत नाही. बघत असलेली स्वप्नं साकार होणार आहेत या कल्पनेत जाणं मुळातच एक सुरेख कल्पना आहे. एक स्वप्न पूर्ण झालं की, त्यानंतर लगेचच दुसरं सुद्धा पूर्ण होईल अन् मग तिसरं….चौथं…..आणि मग….. या भारावलेल्या अवस्थेत खूपच सुख असतं. माणसात नवचैतन्य निर्माण होऊ लागतं. म्हणतात ना, आधी स्वप्न बघा त्यानंतर त्या स्वप्नाला पूर्ण करण्यास योजना तयार करा आणि मग सुरवात करा. जगण्याची पहिली पायरी स्वप्न बघणे ही आहे. डॉक्टर मित्र गावातील लोकांना फक्त स्वप्न बघायला शिकवत होते. हळू हळू त्या सर्वाना स्वप्न बघायची सवय व्हायला लागली. डॉक्टर लोकप्रिय व्हायला लागले. आपल्या कामात सल्ला मागायला लोक त्यांना बोलावू लागले. त्या इवल्याशा गावात एक ऊर्जा निर्माण होत गेली. त्यानंतर तिथले विद्यार्थी शहरात शिकून खूप पुढे गेले. डॉक्टरांनी नुसत्या स्वप्निल गोष्टींनी त्या गावात चैतन्य आणलं. पुढे काही वर्षांनी त्यांची बदलीनंतरही लोकांनी त्यांची ओळख ठेवली आणि निरंतर त्यांचेसोबत संपर्क साधत राहिले. तिथले लोक त्यांना स्वप्नांचा कारभारी म्हणायचे. स्वप्नांच्या राज्यांत फिरवून आणणारे असे बरेच लोक जवळच असतात. त्यांना आपण नीटसं ओळखत नाही पण तरीदेखील कधी प्रत्यय आलाच तर, या लोकांचे असणे आपल्यासाठी आणि समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे हे तुमच्याही सहजच लक्षात येईल.
-वासवदत्ता अग्निहोत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *