सकस लोकशाहीसाठी कॉंग्रेस सक्षम व्हावी

गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे जयपूर येथे नवसंकल्प शिबिर पार पडले. यावेळी पक्षाला नवचैतन्य कसे देता येईल, यावर विचारविनिमय झाला. विविध चर्चा झाल्याच्या बातम्या बाहेर झळकल्या. सर्वच कांँग्रेसजन नव्या उत्साहाने बाहेर पडले आहेत, असे चित्र निर्माण करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस जुन्या स्वरूपात येणार, असा एक विश्‍वास कॉंग्रेस समर्थकांच्या मनात निर्माण होताना दिसतो आहे.
असा विश्‍वास कॉंग्रेस समर्थकांच्या मनात निर्माण होत असेल तर ती बाब स्वागतार्हच आहे. मात्र, केवळ संकल्प करून चालणार नाही तर त्यानुसार कृतीही करणे गरजेचे आहे. एकूण गेल्या सुमारे 40-50 वर्षांचा इतिहास बघितल्यास तिथेच कॉंग्रेस कमी पडते आहे, असे जाणवते आहे. त्यामुळे फक्त संकल्प नको तर आजवरच्या चुकांचा आढावा घेत त्यांची दुरुस्ती कशी करता येईल, यावरही चिंतन करायला हवे. आजतरी कॉंग्रेसजन नेमके तिथेच कमी पडत आहे, असे दिसते आहे.
हा लेख लिहीत असतानाच मला काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्तरावरील एका न्यूज पोर्टेलमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची मुलाखत वाचण्यात आली. कॉंग्रेसमध्ये अनेक परिवाराच्या आधीच्या पिढ्यांना भरपूर लाभ घेतले. आज त्यांचीच मुले पक्ष सोडून जात असल्याबद्दल अनंतरावांनी खंत व्यक्त केली होती. इथेही कॉंग्रेस कुठे चुकते आहे, यावर अनंतरावांनी परखड भाष्यही केले होते. एकूणच गेल्या 70-75 वर्षांतील कांँग्रेसची वाटचाल बघता मुळात लोकशाही भूमिका घेऊन संघटित झालेला हा पक्ष नंतरच्या काळात एकाधिकारशाहीच्या मार्गाने वळलेला जाणवते. त्यातही घराणेशाहीने या पक्षाला पुरते ग्रासून टाकलेले आहे. संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांत सगळी बोंबाबोंबच आहे. या सर्व कारणांमुळे कॉंग्रेसला गेल्या 70 वर्षांत उतरती कळा लागली आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला. भारतीय जनता पक्षानेही या परिस्थितीचा योग्य असा उपयोग करून घेत आपली संघटनात्मक बांधणी केली आणि पक्ष मजबूत करत सत्ता स्थापन केली. त्या पार्श्‍वभूमीवर एका काळात संपूर्ण देशावर अनिर्बंध सत्ता असलेल्या कॉंग्रेसची जेमतेम दोन राज्यांत सत्ता राहिलेली आहे. लोकसभेतही जेमतेम दोन आकड्यांत म्हणजे 50 च्या आसपास असेच कॉंग्रेसचे सदस्य राहिले आहेत. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष हे स्थानही कॉंग्रेसला लोकसभेत मिळवता आले नाही.
असे असले तरी आज देशात कॉंग्रेसची पाळेमुळे घट्ट रोवली आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. कॉंग्रेस पक्ष हा 138 वर्षे जुना पक्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्या काळात कॉंग्रेस पक्ष घराघरात पोहोचला होता. कॉंग्रेससाठी अनेकांनी आपले सर्वस्व देऊ केले होते. अशा निष्ठावंतांच्या मदतीने कॉंग्रेस वाढला होता. विशेष म्हणजे, कॉंग्रेस पक्षाची स्थापना तात्त्विक भूमिकेवर झाली होती. त्यामुळेच कॉंग्रेस एखाद्या जुन्या विशाल वटवृक्षासारखी भारतीय जनमानसात घट्ट रुजली आहे.
असे असले तरी आज कॉंग्रेस दयनीय अवस्थेत आहे हे वास्तवही नाकारता येत नाही. त्या मागे कारणे शोधण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. मध्यंतरी काही जुन्या निष्ठावंत कॉंग्रेसजनांनी यासंदर्भात सोनिया गांधींना पत्र लिहून काही सूचनाही केल्या होत्या. आता अनंत गाडगीळांसारखे जुने निष्ठावंत कॉंग्रेसजन विविध माध्यमातून सूचनाही देत असतात. नवसंकल्प करताना त्यावर चिंतन व्हायला हवे होते. गेल्या 70 वर्षांत काय चुका झाल्या ते शोधायला हवे होते. त्यासाठी कुणालाही जबाबदार न धरता या चुका आता कशा सुधारता येतील, यावर विचार व्हायला हवा होता. यावेळी ते झाले नाही. मात्र, अजूनही वेळ गेली नाही. ते आजही कॉंग्रेस पक्ष करू शकतो. कॉंग्रेस पक्ष इतका माघारण्याचे खरे कारण म्हणजे गेल्या 70 वर्षांत कॉंग्रेसमध्ये रुजलेली घराणेशाही. 1947 पासून कॉंग्रेस पक्षाची सर्व सूत्रे नेहरू-गांधी परिवाराच्याच हातात राहिली. नवीन नेतृत्व समोर येऊच दिले नाही. त्यामुळे हळूहळू कॉंग्रेसला गळती लागू लागली. सुरुवातीला सर्वांत मोठी गळती म्हणजे 1969 साली कॉंग्रेस फुटून तयार झालेली संघटना कॉंग्रेस. नंतर 1977 मध्ये जनता पक्ष आणि जनजीवनराम यांची कॉंग्रेस हे देखील कॉंग्रेस पक्षातून फुटून निघालेलेच गट होते. 1978 मध्ये शरद पवारांची समाजवादी कॉंग्रेस ही त्यातलीच एक. नंतर 1989 मध्ये जनता दल स्थापन करणारे विश्‍वनाथ प्रतापसिंह हे देखील मूळचे कॉंग्रेसजनच होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसही कॉंग्रेसमधूनही फुटलेली आहे. जर कॉंग्रेसमध्ये घराणेशाही राहिली नसती आणि जुन्या राजराजवाड्यांच्या परंपरेनुसार राजाचा मुलगाच सिंहासनावर बसणार ही परंपरा टाळून वेळोवेळी नवे नेतृत्व जर समोर आणले असते तर पक्षाची इतकी वाताहत झाली नसती.
या काळात कॉंग्रेस पक्षातली कथित लोकशाही खर्‍या अर्थाने संपुष्टात आली. वर एक सत्ताकेंद्र तयार झाल्यामुळे राज्यस्तरावरही अशी छोटी-मोठी सत्ताकेंद्रे तयार होऊ लागली. मग आमदारानंतर त्यांच्या मुलालाच उमेदवारी द्यायची अशी परंपरा सुरू झाल्यामुळे बरेच इच्छुक कांँग्रेसपासून दूर जाऊ लागले. आजही कॉंग्रेसचे शिर्षस्थ नेतृत्व एकाच कुटुंबाच्या हातात राहिले आहे. अजूनही ते नेतृत्व दुसर्‍या कुणाच्या हातात द्यावे अशी इच्छा कॉंग्रेसजनांना होत नाही. या नवसंकल्प शिबिरात पक्षाच्या वाढीसाठी जे काही निर्णय घेण्यात आले. ते गांधी-नेहरू परिवाराला लागू करण्यात येऊ नयेत असेही ठरवण्यात आल्याचे बोलले जाते. असा न्याय लावला जाणार असेल तर पक्ष वाढणार तरी कसा?
आज पक्षातील या घराणेशाहीने पक्षाचे प्रचंड नुकसान केले आहे हे आधीच नमूद केले आहे. यात या घराणेशाहीमुळे विशेषतः राज्यस्तरावर ज्या सुभेदार्‍या तयार झाल्या आहेत त्यामुळे तळागाळात पक्षाची नेमकी परिस्थिती काय आहे याचे खरे चित्र पक्षश्रेष्ठींसमोर कधीच उभे राहत नाही. अनंत गाडगीळांनी आपल्या मुलाखतीत या मुद्याचा परार्मश घेतला आहे. आज सोनिया गांधी आणि राहूल गांधी हे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. महाराष्ट्रात किंवा तामिळनाडूमध्ये ग्रामीण भागात नेमकी परिस्थिती काय आहे हे सोनियाजींना दहा जनपथवर बसून कळणे शक्य नाही. आज अशा वेळी त्या स्थानिक नेतृत्वावरच विसंबून राहतात. स्थानिक नेतृत्वाने नेमकी माहिती पक्ष नेतृत्वाला द्यायला हवी. मात्र हे स्थानिक नेते त्यांचे लांगूलचालन करणार्‍यांचीच नावे पुढे करतात ज्याचा फटका पक्षाला बसत आला आहे. त्यामुळे पक्षाची तळागाळातल्या माणसासोबत असलेली नाळ तुटली आहे. कॉंग्रेसच्या र्‍हासाची ही काही प्रमुख कारणे आहेत. आणखीनही अनेक कारणे सापडतील. त्यासाठी पक्षाशी एकनिष्ठ असणारे जुने जाणते लोक एकत्र करुन त्यांच्याशी विचारविनिमय करुन पक्ष पुन्हा एकदा बांधण्याची गरज आहे. भारताने स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जितका सक्षम हवा तितकाच विरोधीपक्षही सक्षम असायला हवा. आज भाजप सत्तेत आहे. भाजपवर विरोधी पक्षांचा अंकुश नसला तर सत्ताधारी पक्ष अनिर्बंध होऊ शकतो. देशात अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेला भाजपसोबत कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी कॉंग्रेस सक्षम होणे ही लोकशाहीप्रेमी भारताची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी कॉंग्रेसजनांनी खंबीर होऊन कामाला लागायला हवे.
-अविनाश पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *