बंडखोरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

नाशिक : गोरख काळे

शिवसेनेतून बंडखोरी करणारे नगरविकास विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृषिमंत्री दादा भुसे व आ. सुहास कांदे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी रविवारी (दि. 26) एल्गार करत विराट मोर्चा काढला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ते अमरधामपर्यंत अंत्ययात्रा काढत बंडखोरांचा निषेध करण्यात आला. मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.
यावेळी शिवसैनिकांनी ‘शिवसेना जिंदाबाद, उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ ‘शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’ या घोषणांसह बंडखोरी करणारे शिंदे, भुसे, कांदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून शिव्यांची लाखोली वाहिली. महिला शिवसैनिकांची जबरदस्त गर्दी दिसून आली. सेनेकडून काढण्यात आलेल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेत खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागूल, वसंत गिते, विनायक पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, सुहास कांदे यांच्या नावाची तिरडी बनवून शिवसैनिकांनी अंत्ययात्रा काढली. यावेळी बंडखोर आमदारांचे पुतळे अमरधामच्या प्रवेशद्वारावर जाळण्यात आले. शालिमार, नाशिक जिमखाना, नेपाळी कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, तिवंधा चौकातून, गाडगे महाराज धर्मशाळेपासून नाशिक अमरधाममध्ये पोहचली. अमरधामच्या विसाव्याच्या ठिकाणी अग्निदहन होऊन शोभसभेत धोकेबाजांना श्रद्धांजली वाहत असल्याची भावना व्यक्त केली. माजी नगरसेवक संजय चव्हाण, माजी नगरसेवक ऍड. सुनील बोराडे, नय्या खैरे, भागवत आरोटे, संतोष गायकवाड, योगेश बेलदार, युवा नेते योगेश गाडेकर, सागर भोजने, सचिन बांडे, राहुल दराडे, शिवा ताकाटे, श्याम खोले, रूपेश पालकर, शोभा मगर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, रविवारी सकाळी 11 वाजता नाशकात शिवसेनेने बंडखोरांविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेतर्फे रविवारी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा व्यक्त करण्यासाठी बंडखोरांची अंत्ययात्रा व शक्तिप्रदर्शन मोर्चात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
भुसे, कांदे तुम्ही आता निवडून येऊन दाखवाच..!
यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ना. दादा भुसे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री केले, तर नांदगाव तालुक्यातील नसतानाही सुहास कांदे यांना आमदार केले. यांना अजून काय हवे होते. यांनी पक्षाशी बेइमानी केली. आता यांना त्यांची जागा दाखवूच तुम्ही निवडणूक लढवाच, मतदारसंघातील शिवसैनिक काय आहे, ते दाखवतील. यांना निष्ठा वगैरे काही नसते. स्वार्थ, पैसा हेच यांच्यासाठी आहे. बंडखोरीनंतर काय असते हे शिंदेंपासून ते सर्व बंडखोरांना आगामी काळात दिसेल. शिवसेना आमचा प्राण व श्‍वास आहे. कितीही संकटे येऊ द्या, आम्ही शिवसेनेसोबतच शिवसैनिकांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *