वरून कीर्तन, आतून तमाशा!

के. के. अहिरे
सध्या राजकारणाचे रंग बघता कोण, केव्हा कुठे दिसेल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सत्तेसाठी बेधुंद झालेली माणसं केव्हा काय करतील याचा नेम नाही आणि म्हणून राजकारण्यांवर सामान्य माणसाचा भरोसा राहिलेला नाही. काल-परवा कुठे असलेली माणसं सत्ता हाती मिळताच कुठे पोहोचली, इतका पैसा यांच्याकडे अचानक कुठून आला, यांनी सोन्याचा नांगर आपल्या शेतात फिरवला की काय? याचा विचार सामान्य माणूस करायला लागला. भ्रष्ट मार्गाने पैसा हाती येताच काय करू नि काय न करू अशी त्यांची अवस्था झाली. नैतिकता हा शब्द जणू सामान्य माणसासाठीच आहे, राजकारण्यांना तो अजिबात लागू नाही, असे राजकारणी समजू लागले आहेत. काल-परवा एकमेकांना शिव्या देणारी माणसं सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांच्या गळ्यात पडू लागली आहेत.
शिक्षकांच्या पतसंस्थेतही वरील चित्र सर्रासपणे दिसत आहे. मागील सर्व घडामोडी वाचून बघितल्या तर कोण काय बोलत होते ते लक्षात येईल. नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ही नाशिक जिल्ह्यातील सर्वांत मोठी माध्यमिक शिक्षक पतसंस्था! या संस्थेची निवडणूक लागलेली आहे. 17 जुलै रोजी मतदान आहे. पॅनल निर्मितीची लगीनघाई सुरू आहे, मात्र पॅनलच पूर्ण निर्माण होत नाही अशी गत काहींची झाली आहे. सत्ताधार्‍यांना भ्रष्टाचाराची चटक लागली आहे. वारेमाप पैसा दोन वर्षे जास्त मिळाल्याने जमवला आहे. अनेक प्रकरणांत हात मारला असल्याने काय करता येते हे त्यांना समजून आले आहे म्हणून ‘एसीबी’ची कार्यवाही होऊनही, मोठ्या नाकाने काहींनी पुन्हा निवडणुकीचे बाशिंग बांधण्याची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केली होती. फॉर्म भरण्यापासून वाजतगाजत तयारी सुरू केली. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी जय्यत तयारी केली. त्यासाठी हरकतींची मोठी फाइल रुबाबात घेऊन ते सर्वांसमोर मिरवतही होते. तब्बल 82 उमेदवारांना हरकती घेऊन विरोधकांवर मात करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, त्यात पूर्णतः तेच फसले. ज्यांनी हा उद्योग केला त्यांचेच मोहरे गाळात रुतले आणि स्वतःच नाकघशी पडले. नाशिकच्या तिघांचे फॉर्म उडाले. त्यात दोन संचालक निवडणूक कधी लागते याची वाट पाहून होते. ज्याने मागीलवेळी काही पॅनलचे प्रमुख असलेल्या उमेदवारांचे फॉर्म उडवले होते, तो तर फार जोरात होता, पण वेळ यावी लागतात असे म्हणतात तसेच घडले. त्याचाच फॉर्म विरोधकांनी आल्हाद उडवला. त्याला नामशेष करण्याची पाळी आता विरोधकांवर होती आणि तो विरोधकांचा डाव यशस्वी झाला. विरोधक जिंकले. ती मग्रुरी, ती भाषा संपुष्टात आली. दुसरीकडे मागील वेळी दोन उमेदवार ऐनवेळी गद्दारी करून विरोधकांना सामील झाले. निवडूनही आले. ती सल पाच वर्षे कायम होती. यावेळी त्याचेही उट्टे विरोधकांनी काढले आणि त्यापैकी एकाचा फॉर्म त्यांच्याच लोकांच्या खेळीमुळे उडाला आणि दुसर्‍याला तर संस्थेनेच उमेदवारी करू नको असे सांगितले असताना, तो ऐकायला तयार नसल्याने संस्थेने दुसरा उमेदवार जाहीर केला. मागच्या निवडणुकीचे सर्व उट्टे विरोधकांनी यावेळी काढले. वर्तुळ पूर्ण झाले. आजच सत्ताधारी गट निवडणुकीपूर्वीच धारातीर्थी पडला. त्यांच्या बाजूने काही भ्रष्ट लोक उमेदवारीसाठी तयार झाले की, जे जुनी पेन्शन योजना, शालार्थ आयडीसारख्या प्रकरणात सहभागी आहेत.
मागील वेळी ज्यांच्यामुळे सत्तेत बसता आले त्याच प्रमुख नेत्यांना सत्तेच्या हपापलेपणामुळे नंतर काहींनी बाजूला केले. बाजूला केल्यामुळे ती सल त्या नेत्यांमध्ये आजही आहे. वरवर दिसताना काही नेते जरी बरोबर दिसत असले तरी त्या नेत्याची यावेळी जिरवायची, अशी परिस्थिती आतून आहे. म्हणजेच थोडक्यात वरून कीर्तन, आतून तमाशा अशी आजची स्थिती आहे. आज गोड बोलून एकत्र येण्याची हाक देत असतील पण उद्या पुन्हा असे घडणार नाही याची शाश्‍वती काय? त्यापेक्षा सोबत राहूनच ही जड मुळापासून उखडून टाकून आपली प्रतिष्ठा राखण्यातच हित आहे, हे त्यांनी ठरवले आहे. ज्यांनी खूप गाजावाजा केला आणि निवडणुकीसाठी भ्रष्ट मार्गाने जमा केलेला पैसा रसद म्हणून पुरवण्याचे काम सुरू केले असले तरी पापाचा पैसा जास्त दिवस टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तीच माणसं गाळात रुतल्याने आता ते काय करतील असाही मोठा प्रश्‍न नेत्यांना पडला आहे. उद्या विरोधक निवडून आले तर हे पाप बाहेर येणारच, तेव्हा आपण उगाच या भ्रष्ट लोकांबरोबर आपली प्रतिष्ठा का धुळीस मिळवायची, असाही प्रश्‍न नेत्यासमोर आहे.
यातले काही लोक प्रत्येक निवडणुकीत आपला नेता बदलतात. त्यांच्यावर का विश्‍वास ठेवावा हाही प्रश्‍नच आहे. आजची परिस्थिती पाहता सत्ताधारी गटाकडून वर्षानुवर्षे तीच तीच नावे सर्व ठिकाणी आजतागायत पुढे आलेली असल्याने यांनी कधी दुसरे मोठेच होऊ दिले नाहीत हा रोष सामान्य सभासदांमध्ये खदखदत आहेच. मग तालुक्यात हीच माणसं आहेत का, जो आपल्या पायी लोटांगण घालेल, पायघड्या पसरेल, ऊठबस करेल! मुख्याध्यापक संघाचा एक मोठा नेता खूप गोड बोलतो, खोटारड्या बातम्या पसरवतो, अधिकार्‍यांच्या पुढे पुढे करतो, त्यांना पाहिजे ते पुरवतो, त्याची गत तर घर का न घाट का अशी झाली. सुरुवातीला सहा महिने अपूर्व भाऊ यांच्या गोटात फिरत असलेला हा नेता आम्ही मुख्याध्यापक संघ सोबत घेऊन मुख्याध्यापक संघाचे पॅनल करू, अशा वल्गना गावभर करत होता. त्याच्याच तालुक्यात त्याला दुसरा उमेदवार मिळेना म्हणून अखेर सौ.वतींना त्याने पुढे केले, असे लोक बोलू लागले.
शेवटी अपूर्वभाऊंकडे आपली डाळ शिजत नाही हे बघून सत्ताधार्‍यांच्या व्यासपीठावर अचानक चमकला, तेही सोडून नंतर आपल्या सौ.वतीची जागा फिक्स होत नाही म्हणून प्रत्येक दाराला धडक्या मारून आला. बाकीचे उमेदवार वार्‍यावर सोडून आता हे महाशय फक्त माझ्या पत्नीची उमेदवारी मागू लागले म्हणजे स्वतःच्या पत्नीसाठी त्यांचा अट्टहास होता हे उमगल्याने त्यांची गोची झाली. आजच्या स्थितीला अनेक तालुक्यांत उमेदवारच नसल्याने कसेतरी लंगडे का होईना पॅनल बनवायचे आणि आपली इभ्रत राखायची एवढंच त्यांचं आता गणित राहिले. पण उमेदवार अशा लंगड्या पॅनलला कितपत स्वीकारतील हा मोठा प्रश्‍न आहे. भ्रष्ट लोकांबरोबर उमेदवारी करायची नाही. काही चांगल्या उमेदवारांना त्यांच्यावर विशिष्ट नेत्यांचा शिक्का बसलेला असल्याने त्यांच्या उमेदवारीला अडचण निर्माण झाली. आज इतर गटांतील उमेदवार माझी उमेदवारी फक्त फायनल करा म्हणून विनवण्या करू लागले. निवडणूक येण्यापूर्वीची गणिते आणि निवडणूक लागल्यानंतर नामनिर्देशनानंतर उमेदवारीची गणिते फिरत असतात हे या अतिउत्साही नेत्यांना कोण सांगणार? ज्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांना उलटसुलट सांगूनही काहीच फायदा होत नसल्याने, एकत्र येण्याची वल्गना करणारेच आत्ता दोन उमेदवार घ्या, अशा आणाभाका घेऊ लागले. आम्ही एक आहोत असे म्हणणारे हे विसरले की घरातली चार माणसं एक राहत नाहीत. इथे तर सत्तेसाठी गोष्टी चाललेल्या आहेत तिथे फूट पडणारच. आपलाच फक्त स्वार्थ पाहिला तर लोक बाजूला जाणारच हेही यांच्या लक्षात आले नाही. कोणाच्यातरी वरवर सांगण्याने नीटसा विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही. आजही काही उमेदवार तिकीट मिळत म्हणून घ्या, पण कुठून व का? याचाही सारासार विचार न करता जात असतील तर ते आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.
कुणाला आपली इभ्रत राखायची, कुणाला नेता व्हायचं, कुणाला सत्तेची चटक स्वस्थ बसू देईना, तर कुणाला आपल्या सौ.वतीची सोय करायची, काही तर असे लोक आहेत की ते आजवर कुंपणावर होते. परिस्थिती पाहून उडी टाकायची हा त्यांचा डाव, उमेदवार तर आपले पाहिजेत पण त्यांच्यासाठी वेळ द्यायला वेळ नाही, मग पुढे प्रचाराचे काय, आपल्या नावासाठी उमेदवारांच्या नावाचा फक्त आग्रह धरायचा मग पुढे काहीही होवो हे त्यांचे गणित उमेदवारासाठी मात्र घातक आहे हे कळायला हवं. आपलं उमेदवारासाठी काहीही योगदान नसताना त्यांना मारणी घालणं कितपत योग्य आहे? त्यासाठी स्वतःच पूर्णवेळ योगदान असायला हवं. मग वेळेवर हाच हवा, तो चालणार नाही हे आपल्या पुरते सीमित ठेवणे किती योग्य आहे? निवडणूक आली की वेगळं बोलायचं आणि त्यापूर्वी वेगळं बोलायचं हे कधी न कधी उघड होतेच. अशा काळात अस्वस्थ करण्यासाठी काही विधाने केली जातात. पण, जे ठाम असतात तेच असल्या गोष्टींना भीक घालत नसतात. थोडक्यात काय तर तोंडावर वेगळे आणि मागेपुढे वेगळी बोलणारी माणसं खरं तर निवडणुकीतच बघायला मिळतात आणि याच माणसांचा वरून कीर्तन आणि आतून तमाशा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *