आ. सीमा हिरे यांची विधिमंडळात उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत यांनी कथितपणे मजामस्तीतून केलेल्या गोळीबाराच्या घटनेला महिना उलटूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार सीमा हिरे यांनी गुरुवारी विधिमंडळात शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ही घटना अत्यंत गंभीर असून, तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आ. हिरे यांनी सभागृहात सांगितले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना पोलीस ठाण्याच्या परिसरात गोळीबार होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
त्यांनी असा आरोप केला की, पो.नि. राजपूत यांनी अंबड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सिडको परिसरातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. मारामार्या, तोडफोड तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा करत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींशी राजपूत यांची वर्तणूकही उर्मट असल्याचा आरोप केला. त्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचेही आ. हिरे
यांनी म्हटले.
महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात काही अधिकारी व कर्मचार्यांसमवेत असताना पो.नि. राजपूत यांनी कथितपणे मजामस्तीतून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत गोळी लागून पोलीस उपनिरीक्षक साळुंखे आणि हवालदार दत्ता धिंडळे जखमी झाले होते. या प्रकारामुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेनंतर इतका कालावधी लोटूनही संबंधित अधिकार्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याबद्दल आ. हिरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकार्याला नेमके कोण आणि का पाठीशी घालत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
घटना दडपण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजही गायब करण्यात आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. सीमा हिरे यांनी शासनाकडे केली.
Take action regarding the firing incident involving the Ambad police inspector.