निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम

निफाड : तालुका प्रतिनिधी
शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी (दि. 19) निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश घोडे आणि निफाड पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात शहरात सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
सुरत- वघई- वणी- निफाड- सिन्नर या राज्य मार्गावर निफाड शहरातील शांतीनगर चौफुली ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब ठरली होती. दोन वर्षांपूर्वी निफाड नगरपंचायतीने अतिक्रमणे काढली होती. मात्र, दुसर्‍याच दिवशी पुन्हा ’जैसे थे’ स्थिती झाल्याने नगरपंचायतीने या अतिक्रमणाचा चेंडू सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न केला. आता राबविण्यात येणार्‍या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारक आणि प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमकीदेखील झडल्या. सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरूच होती.शहरातील रस्त्याच्या दुतर्फा 15 मीटरचे अतिक्रमण काढल्याने गाळेधारक, तसेच प्रवासी वाहनचालक शालेय विद्यार्थी चाकरमानी यांनी प्रशासनाचे
आभार मानले.
आता या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याने शांतीनगर चौफुली ते पंचायत समितीपर्यंत होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील सुटणार आहे. मात्र, या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेणे
गरजेचे आहे.

प्रशासनाने अतिक्रमणविरोधी धडक मोहीम राबविल्याने या मोहिमेचे आम्ही स्वागत करतो. मात्र, आता पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. हातगाडेधारकांंनीदेखील रस्त्यावर गाडे न लावता प्रशासनाला सहकार्य करावे.
– प्रवीण सानप, व्यावसायिक, निफाड

आमचा कुटुंबाचा गाडा याच व्यवसायावर असल्याने नगरपंचायतीने आम्हाला पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करावे. व्यवसायासाठी जागा देताना आमचा धंदा चालेल अशा ठिकाणी जागा द्यावी. सध्या आमचा व्यवसाय बंद झाल्याने रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
– निवृत्ती मेंधणे, पानटपरीधारक, निफाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *