महापौरांकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत ग्राहक सेवा केंद्रांच्या माध्यमातून 6 लाख 27 हजारांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी महासभेत केला. विशेष म्हणजे यावेळी बडगुजर यांनी महासभेत थेट पुरावेच सादर केले. दरम्यान सदर प्रकरणाची महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गंभीर दखल घेत थेट आयसीआयसीआय बँकेच्या संबंधित कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्तीचे निर्देशही दिले.
सोमवारी (दि.20) महासभा सुरू होताच नगरसेवक बडगुजर यानी महापालिकेच्या करवसुलीत नागरी ग्राहक सेवा केंद्रांच्या माध्यमातून सन 2018 ते 2022 दरम्यान कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला.
तत्कालीन अधिकारी राबडीया यांनी 28 जुलै 2022 रोजी पत्र देत फेब्रुवारी ते जुलै 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत ग्राहक सेवा केंद्रामार्फत वसूल झालेल्या रकमेची माहिती मागवली होती. त्यावेळी 223 ई-चलने रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या रद्द करण्यात आलेल्या चलनांची एकूण रक्कम 6 लाख 27 हजार 650 रुपये इतकी होती. गंभीर बाब म्हणजे, ही ई-चलने रद्द करण्यात आली असली तरी संबंधित रक्कम प्रत्यक्षात वसूल झाल्याचे आढळून आले आहे. महापौरांच्या सूचनेनंतर मुख्यलेखापरीक्षक बळवंत गायकवाड यांनी लेखापरीक्षणातही ही त्रुटी आढळल्याची कबुली दिली. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून बँक कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर आहेर-आडके यांनी दिले. दरम्यान, एकाच विभागात हा भ्रष्टाचार झाला असताना पंचवटी सोडून इतर विभागातही अशाच प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी सभागृहात सदस्यांनी केला आहे. त्याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
दोषींना सोडून तक्रार करणार्यावरच कारवाई
करवसुलीच्या पावत्यांमध्ये खोडाखाड करून 6.27 लाखांची हेराफेरी झाल्याचे सिध्द झाल्यानंतर या भ्रष्टाचाराची कबुली खुद्द तत्कालिन पंचवटी विभागीय अधिकारी राबडिया यांनी लेखी पत्राद्वारे दिली. मात्र या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे सोडून राबडिया यांनाच याप्रकरणी जबाबदार धरुन त्यांच्या वेतनातून वसुलीसाठीची नोटीस दिली गेल्याची धक्कादायक बाब बडगुजर यांनी समोर आणली. यावेळी त्यांनी यातील संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली.
Tax collection scam; Badgujar’s allegations with evidence