नाशिक

महायुतीत तणाव; तपोवनात शिंदेसेनेचे आंदोलन

भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; प्रतीकात्मक करवत, कुर्‍हाड जाळून निषेध

नाशिक : प्रतिनिधी
तपोवनातील वृक्षतोडीवरून महायुतीतच संघर्ष निर्माण झाला असून, अजित पवारांनंतर आता शिंदेसेनेनेदेखील या प्रकरणात उडी घेत शुक्रवारी (दि.5) तपोवनातील साधुग्राममध्ये आंदोलन केले. तसेच यावेळी प्रतीकात्मक करवत, कुर्‍हाड जाळून प्रशासनाचा निषेध केला. आणि अठराशे वृक्षतोडीचा प्रस्ताव मागे घेण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, तपोवनातील वृक्षांवरून महायुतीत ठिणगी पडली असून, याद्वारे भाजपला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

शिंदेसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेकडून (शिंदे गट) आंदोलन करत वृक्षतोडीच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला. महायुतीतील घटक पक्षांकडूनच आंदोलन केले जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्याच्या विरोधात विविध संघटना, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. तपोवन परिसरात शिंदेसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने एकत्र येत हातात वृक्षतोडीला विरोध दर्शविणारे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वृक्षतोड थांबवा, अन्यथा तीव्र परिणाम भोगा, असा इशारादेखील देण्यात आला. प्रशासनाची भूमिका संशयास्पद हा मुद्दा संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणीही या विषयात राजकारण आणू नये, ही झाडंच राहिली नाहीत तर काय होईल. साधुसंतांना कुंभमेळा साजरा करण्यासाठी झाडेच लागतात, मला वाटत नाही की, कोणीही साधुसंत येथील झाडे तोडून येथे साधुग्राम बांधण्यास तयार होईल. हा मुद्दा आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकू आणि नाशिककरांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू. एकदा आपण प्रशासनाशी बोला, प्रशासन नक्की काय करते आहे? प्रशासनाचा विचार काय? असा प्रश्न आपण त्यांना विचारा, असे आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार असून, प्रशासनाची ही भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शिंदेसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी तातडीने मोठा पोलिस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता. नाशिक शहर पोलिस आणि दंगा नियंत्रण पथक यावेळी तैनात करण्यात आले होते.

महिला पदाधिकार्‍यांनी वृक्षांना बांधल्या राख्या

महिलांकडून वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या शिंदेसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ओवाळणी करून येथील वृक्षांना राख्यादेखील बांधण्यात आल्या. सदर वृक्ष म्हणजे आमचे भाऊ, असा संदेशदेखील यावेळी देण्यात आला. हे झाड आमचे भाऊ असून, याच्यावर कुठलीही कुर्‍हाड चालू देणार नसल्याची भूमिकादेखील यावेळी शिंदेसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांंकडून घेण्यात आली.

साधुग्राम साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

साधुग्राममधील झाडे तोडण्यासाठी प्रशासन एवढा अट्टहास का करत आहे? मुळात नाशिककरांची भावना भाजपला का दिसत नाही, तसेच साधुग्राममधील जागा साधूंसाठी की संधिसाधूंसाठी, यावरच संशय येतो आहे. जनता जनार्दन असून, जनतेपेक्षा कोणीही मोठे नाही हे भाजपनेही लक्षात घ्यावे. त्यांनाही जनतेत जावे लागणार आहे. शिवसेनेची नाळ नेहमीच सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली असून, सत्ता असो किंवा नसो, त्यांच्या हक्कासाठी सदैव रस्त्यावर असते.

                                                                   – अजय बोरस्ते, उपनेते, शिंदेसेना

नाशिकला भकास करणारा विकास नको

नाशिकला भकास करून विकास आम्हाला नकोय. कुंभमेळ्याच्या नावाखाली 33 वर्षे ही जमीन खासगी ठेकेदाराच्या ताब्यात देण्याचा हा उद्योग आहे. ठेकेदारीसाठी 1700 झाडांची कत्तल करणे महापाप आहे. जिथे संवेदना तिथे शिवसेना कायम आहे. झाडे तोडून कुंभमेळा साजरा करणे साधू-महंतांनाही आवडेल काय? वृक्षतोडीला आमचा विरोधच राहील. महापालिका प्रशासनाने या प्रकरणी तत्काळ भूमिका स्पष्ट करून ही झाडे तोडली जाणार नाहीत, याची ग्वाही द्यावी.                                 -प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, शिंदेसेना

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गावकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, 1 वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यातील साठ हजार शाळा बंद

राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन; अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा पुणे : टीईटी परीक्षेच्या विरोधात शुक्रवारी (दि. 5)…

8 hours ago

नाशिक गारठले तापमानात घट

नाशिक गारठले : गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा…

8 hours ago

घरपट्टी थकबाकीचा डोंगर 920 कोटींवर

चार महिन्यांत सातशे कोटी वसुलीचे मनपाला आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील करदात्यांकडील थकबाकीचा आकडा तब्बल…

10 hours ago

रस्ता मोजणी अधिकार्‍यांना पाठविले परत

घोटी-त्र्यंबकेश्वर वाढीव रस्त्याचा प्रश्न; पोलिसांनी शेतकर्‍यांना घेतले ताब्यात घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील घोटी- त्र्यंबकेश्वर…

10 hours ago

जो कधी चुकला नाही, त्याला माणूस म्हणावे तरी कसे?

मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जो कधी चुकतच नाही तो माणूसच नाही, असे म्हटले तर…

10 hours ago

जग बदलणार्‍या महामानवाचे महापरिनिर्वाण

शातील गोरगरीब, वंचित, पीडित, शोषित व दलित समाजातील शूद्र व अतिशूद्र प्रवर्गातील लोकांना न्याय, समता,…

10 hours ago