दोन एकरपेक्षा अधिक जागेवर तात्पुरती निवासव्यवस्था
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक-त्र्यंबकेळ्वरमध्ये दाखल होणार्या भाविकांच्या निवासासाठी आता खासगी जमिनीवर टेंट सिटी उभारता येणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने यासाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे. किमान दोन एकर खासगी जमिनीवर तात्पुरती निवास वसाहत उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. जमीनमालक तसेच जमीनमालकाशी सामंजस्य करार केलेल्या संस्थांना यासाठी अर्ज करता येणार आहे.
सिंहस्थ काळात शहरातील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर येणारा अतिरिक्त ताण कमी करण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था उभारण्यात येणार आहे. टेंट सिटीमध्ये निवासासोबत स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, भोजन, सुरक्षा आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. नदी, नाला किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडण्यास मनाई राहणार आहे. उघड्यावर कचरा टाकणे अथवा कचरा जाळण्यासही प्रतिबंध असेल. कचर्याच्या निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण करून अधिकृत संस्थेमार्फत दररोज संकलन करावे लागणार आहे.
प्रत्येक टेंट सिटीसाठी स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. यात आग, गर्दीचे व्यवस्थापन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, स्थलांतर आणि हवामानाशी संबंधित इशार्यांचा समावेश असेल. सर्व वायरिंग सुरक्षित असणे, अर्थ-लिकेज सर्किट ब्रेकर बसविणे आणि भाविकांच्या निवासापूर्वी विद्युत सुरक्षा तपासणी करणे आवश्यक राहील.
सिंहस्थ काळातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त व नियोजनबद्ध निवासव्यवस्था निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भाविकांना सुरक्षित व सुविधांयुक्त निवास मिळावा यासाठी सुरक्षा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि आपत्कालीन तयारीचे निकष निश्चित केले आहेत
– शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण
टेंट सिटीसाठी महत्त्वाचे निकष
♠ किमान दोन एकर खासगी जमीन.
♠ जमीन सलग व बोजामुक्त असणे आवश्यक.
♠ स्वच्छतागृहे व स्नानगृहांची पुरेशी व्यवस्था.
♠ पाणी, वीज व वाहनतळाची सुविधा.
♠ कचरा वर्गीकरण व दररोज संकलन.
♠ अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा तपासणी.
♠ आपत्कालीन कृती आराखडा बंधनकारक.
Tent city on private land for Simhastha