सच होंगे ‘तेरे मेरे सपने’

विवाहपूर्व समुपदेशनाचा 860 जणांनी घेतला लाभ

नाशिक : देवयानी सोनार
आजकाल लग्न जमविणे जसे कठीण आहे, तसे ते टिकवणे त्याहून अधिक कठीण झाले आहे. मुला-मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा, लग्नानंतर क्षुल्लक कारणांहून होणारे घटस्फोटही चिंतेचा विषय बनले आहे. त्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांना वैवाहिक जीवनाची योग्य जाणीव करून देत सुदृढ जबाबदार आणि आनंदी कुटुंबव्यवस्था घडविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेल्या ‘तेरे मेरे सपने’ हे विवाहपूर्व समुपदेशन केंद्र मदतगार ठरत आहे. आतापर्यंत 860 जणांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे.
अलीकडच्या काळात सिया आणि केतन प्रकरणानंतर विवाहपूर्व समुपदेशनाची गरज प्रकर्षाने समोर आली आहे. विवाहापूर्वी समुपदेशन केल्याने नवदाम्पत्यांना विवाहाचे महत्त्व, जबाबदार्‍या आणि कुटुंबव्यवस्थेची जाण करून देण्यास मदत होत आहे.
विवाह ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांची जुळणारी नाती असतात. या नात्याची भक्कम पायाभरणी व्हावी, पती-पत्नीमध्ये परस्पर विश्वास, संवाद आणि समज वाढावी तसेच भविष्यातील कौटुंबिक वाद टाळता यावेत, या उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने ‘तेरे मेरे सपने’ हा विवाहपूर्व समुपदेशन उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये या उपक्रमांतर्गत विवाहाची तयारी करणार्‍या तरुण-तरुणींना विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.
समुपदेशनादरम्यान नवदाम्पत्याशी मुक्त संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, स्वप्ने, जबाबदार्‍या, परस्परांचा आदर, संवादाचे महत्त्व, कुटुंबातील नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विवाहानंतर उद्भवणार्‍या अनेक समस्या टाळण्यास मदत होत आहे.
याशिवाय, महिलांचे आणि पुरुषांचे वैवाहिक हक्क, कौटुंबिक कायदे, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक न्यायव्यवस्था, महिलांच्या संरक्षणासंबंधीचे कायदे तसेच पती-पत्नींची कायदेशीर कर्तव्ये यांची माहितीही दिली जाते. त्यामुळे विवाहानंतर उद्भवणारे गैरसमज, मतभेद आणि कौटुंबिक वाद कमी करण्यास
मदत होते.
समुपदेशन प्रक्रियेत मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती सहभागी होऊन भावी जोडप्यांशी संवाद साधतात. प्रत्येक जोडप्याला त्यांच्या परिस्थितीनुसार स्वतंत्र मार्गदर्शन दिले जाते. या प्रक्रियेमुळे विवाहाचा निर्णय अधिक विचारपूर्वक घेण्यास आणि वैवाहिक जीवनाची मानसिक तयारी करण्यास मदत होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या मते, विवाह टिकवून ठेवण्यासाठी परस्पर संवाद, विश्वास, समानता आणि एकमेकांप्रति आदर या मूल्यांची जपणूक आवश्यक आहे. ‘तेरे मेरे सपने’ उपक्रमाचा मुख्य उद्देशही हाच असून, समंजस, सुदृढ आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी भावी पती-पत्नींना योग्य दिशा देण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे.

‘तेरे मेरे सपने’ हे विवाहपूर्व संवाद केंद्र राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली येथे विवाहित जोडप्यांना विवाहपूर्व संवाद आणि समुपदेशन प्रशिक्षित समुपदेशकामार्फत करण्यात येते. सर्वांना अशी विनंती आहे की, विवाह जमल्यानंतर इच्छुक वधू-वर यांनी या समुपदेशन केंद्रात संवादासाठी जरूर लाभ घ्यावा.
– सुनील दुसाने, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी

राष्ट्रीय महिला आयोगाने विवाहसंस्थेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘तेरे मेरे सपने’ या विवाहपूर्व समुपदेशन उपक्रमाची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये ही केंद्रे कार्यरत असून, नाशिकमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी मानवतावादी बहुद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महिला आयोगाच्या मान्यतेने केली जात आहे. विवाहाची तयारी करणार्‍या युवक-युवतींसह त्यांच्या पालकांनाही आवश्यकतेनुसार समुपदेशन दिले जाते. या उपक्रमात विवाहापूर्वी जोडप्यांमध्ये मोकळा आणि सकारात्मक संवाद घडवून आणण्यावर भर दिला जातो. एकमेकांच्या अपेक्षा, स्वभाव, कुटुंबातील भूमिका, आर्थिक नियोजन, करिअर, घरगुती जबाबदार्‍या, मुलांच्या संगोपनाबाबतची भूमिका, निर्णयप्रक्रिया, तसेच वैवाहिक जीवनात उद्भवू शकणार्‍या अडचणींवर कशा प्रकारे मात करावी, याविषयी मार्गदर्शन केले जाते.

मार्चपासून उपक्रमाला प्रारंभ
नाशिकमध्ये या उपक्रमाला मार्च 2025 मध्ये प्रारंभ झाला. मार्च महिन्यात दोन जणांनी या केंद्रातील समुपदेशनाचा लाभ घेतला. एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात केंद्राकडे कुणीच फिरकले नाही. मात्र, एप्रिलनंतर या समुपदेशन केंद्राकडे येणार्‍यांची संख्या वाढली. डिसेंबरमध्ये 104 जणांनी तर एप्रिलमध्ये सर्वाधिक 120 जणांनी लाभ घेतला. मार्चपासून ते जून 2026 पर्यंत 860 जणांनी समुपदेशनाचा लाभ घेतल्याचे आकडेवारीत दिसून येते.

 

‘Tere Mere Sapne’ will be true

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *