शहर झोपते… रस्त्यावर मात्र वृद्ध जागेच!

– अफजल पठाण

सिग्नलवर गाडी थांबते… आणि थरथरणार्‍या हातांनी एखादा वृद्ध आपल्या काचेवर हलकेच टकटक करतो. चेहर्‍यावर खोल सुरकुत्या, डोळ्यांत असहाय्यता, अंगावर साधे कपडे आणि ओठांवर फक्त एकच विनंती बाबा… दोन घास खायला द्या. त्या क्षणी आपण खिशातून दहा-वीस रुपये काढतो किंवा नजर चुकवून पुढे निघून जातो. पण कधी त्या वृद्धाच्या डोळ्यांत डोकावून पाहिलं आहे का? त्या डोळ्यांत भूक कमी आणि आयुष्यभराच्या संघर्षाची वेदना अधिक दिसते. शहरातील अनेक रस्त्यांवर, चौकांमध्ये, सिग्नलजवळ, धार्मिक स्थळ परिसरात आणि बाजारपेठांच्या आसपास रात्री उशिरापर्यंत असे अनेक वृद्ध बसलेले दिसतात. दिवसभर भीक मागून थकलेले शरीर तरीही घरी परतण्यासाठी घरच नाही. त्यामुळे रात्रीची शांतता पसरल्यानंतरही ते रस्त्याच्या कडेला आपली चादर अंथरूण बसलेले किंवा झोपलेले दिसतात. यात वृद्ध महिलांची संख्या विशेषतः जाणवते. हातात एखादी छोटी पिशवी, अंगावर साधी साडी, चेहर्‍यावर काळजीच्या रेषा आणि डोळ्यांत उद्याच्या दिवसाची चिंता काही वृद्ध महिला दिवसभर कुणी काही देईल या आशेने रस्त्याच्या कडेला बसलेल्या दिसतात. रात्री उशिरापर्यंत त्या त्याच ठिकाणी असतात. त्या दृश्याकडे पाहताना मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात या माउलीचं घर कुठे आहे? तिची मुलं कुठे आहेत? तिच्या वृद्धापकाळाचा आधार कोण आहे? हा वृद्ध किंवा ही वृद्ध महिला जन्मापासून भिकारी नव्हती. त्यांनीही आयुष्यभर कष्ट केले असतील. संसार उभा केला असेल. मुलांना वाढवलं असेल. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्यांच्या भविष्यासाठी आयुष्य खर्ची घातलं असेल. पण आज त्याच हातांना दोन वेळच्या अन्नासाठी अनोळखी माणसांसमोर हात पसरावे लागत आहेत. ज्यांनी आपल्या मुलांना बोट धरून चालायला शिकवलं, त्यांनाच आज रस्त्यावर आधारासाठी दुसर्‍यांचा हात शोधावा लागतोय यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? प्रश्न फक्त गरिबीचा नाही. प्रश्न आहे नात्यांच्या बदलत्या स्वरूपाचा. आज अनेक घरांमध्ये वृद्ध आई-वडिलांना ओझं समजलं जातं. ज्यांनी मुलांसाठी आयुष्य घालवलं, त्यांनाच वृद्धापकाळात एकटेपणाची शिक्षा मिळते. काहींना मुलांनी सांभाळणं सोडलं, काहींना परिस्थितीने घराबाहेर आणलं, तर काहींनी अपमान आणि दुर्लक्ष सहन करत रस्त्याचा आधार घेतला. आपण मोठमोठी घरे बांधतो, महागड्या गाड्या घेतो, सुखसुविधा वाढवतो; पण ज्यांनी आपल्याला या जगात आणलं, त्यांच्या वृद्धापकाळासाठी आपल्या घरात जागा आणि मनात वेळ उरत नाही, ही मोठी विसंगती आहे! रात्री उशिरा आपण आपल्या सुरक्षित घराकडे परततो. पण त्याच वेळी शहराच्या एखाद्या कोपर्‍यात एखादी वृद्ध माउली आपली चादर अंगावर ओढून बसलेली असते. कदाचित तिच्या डोळ्यांत झोप नसते; असतो तो फक्त एक प्रश्न माझं स्वतःचं असं कुणी आहे का? याचे उत्तर आपण समाज म्हणून शोधणार का?
रस्त्यावर भीक मागणार्‍या प्रत्येक वृद्धाकडे केवळ दयेच्या नजरेने पाहण्यापेक्षा त्यामागची परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. शक्य असेल तिथे मदत करावी, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे अशा वृद्धांना सुरक्षित निवारा, अन्न, आरोग्यसेवा आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळण्यासाठी समाजाने आणि प्रशासनानेही पुढाकार घ्यायला हवा. कारण वृद्धांना फक्त भीक नको असते… त्यांना आपलेपणा हवा असतो. त्यांना पैशांपेक्षा दोन प्रेमाचे शब्द अधिक मौल्यवान वाटतात. प्रत्येक मुलाने स्वतःला एक प्रश्न विचारावा ज्यांनी माझं बालपण सांभाळलं, त्यांच्या वृद्धापकाळाची जबाबदारी मी स्वीकारणार आहे का? कारण आज रस्त्यावर बसलेली ती वृद्ध माउली कदाचित कुणाची तरी आई आहे…आज हात पसरलेला तो वृद्ध कदाचित कुणाचा तरी बाप आहे आणि उद्या त्याच रस्त्यावर आपणही असू शकतो. म्हणून रस्त्यावरच्या त्या सुरकुतलेल्या चेहर्‍याकडे पाहताना केवळ नजर वळवू नका, एकदा मनानेही त्यांच्याकडे पाहा. कदाचित त्यांच्या डोळ्यांत आपल्याच भविष्याचं प्रतिबिंब दिसेल.

The city sleeps… yet on the streets, the elderly remain awake!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *