सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा शंखनाद!

रामकुंड येथे ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला काल रामकुंड येथे ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने औपचारिक सुरुवात झाली.
‘जय श्रीराम’च्या जयघोषात आणि वेदमंत्रोच्चारात झालेल्या या सोहळ्यात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, विविध सामाजिक व धार्मिक संघटना तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघाच्या वतीने कमला एकादशीच्या पर्वावर पवित्र रामकुंड येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, संकटमोचन सेनेचे संस्थापक महंत संजयदास महाराज, श्री दिगंबर अनी आखाड्याचे श्री महंत वैष्णवदास महाराज, मंगल पीठाधिश्वर डाकोर खालसाचे माधवाचार्य महाराज, नरेंद्राचार्य स्वामी महाराज, निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीधरदास महाराज, महंत मोहनदास महाराज, श्री निर्मोही अनी आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, महंत रामजीदास महाराज, सिंहस्थ कुंभमेळा प्रवक्ते महंत भक्तिचरणदास महाराज, दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे महंत रामस्नेहीदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांच्या संत-महंतांसह महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे संत-महंत
उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती मिळाली असून, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे 35 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या कामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज आणि संजयदास महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद, मंत्रोच्चार आणि टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी वेदमंत्रोच्चार केले. यावेळी संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

नाशिककरांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे
ना. गिरीश महाजन म्हणाले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून 12 कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याची अपेक्षा असून, मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत ही संख्या चार ते पाच पट अधिक असेल. त्यामुळे कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ शासन व प्रशासनाची नसून, प्रत्येक नागरिकाची असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संस्था आणि भाविकांनी पुढाकार घेतल्याचे नमूद करत ही स्वच्छता सातत्याने कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच देश-विदेशातून येणार्‍या भाविकांच्या आदरातिथ्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असेही त्यांनी शिलान्यास पूजन सोहळ्याप्रसंगी सांगितले.

The clarion call for Simhastha Kumbh Mela preparations!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *