संसदेच्या अधिवेशनापूर्वी संबोधनात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली : प्रतिनिधी
जगातील विविध भागांमध्ये सुरू असलेले संघर्ष आणि विशेषतः पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन, एलपीजी, खते आणि रसायने यांसारख्या क्षेत्रांवर मोठा परिणाम होऊन भारतासारख्या ऊर्जा-अवलंबित देशांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, या सर्व जागतिक संकटांचा खंबीरपणे सामना करत भारताने 7.7 टक्के इतका उल्लेखनीय विकासदर नोंदवला असून, आपला देश सध्या जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी देशाची ताकद, लवचिकता आणि नवीन उंची गाठण्याचा दृढनिश्चय दर्शवते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी संबोधनात, पंतप्रधानांनी या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. भारतीय तरुणांची क्षमता आणि त्यांच्या आकांक्षा अमर्याद असून, देशाने सध्या विकासाची जी गती पकडली आहे, त्याला संसदेतील सकारात्मक कामकाजातून नवी ऊर्जा मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाची प्रलंबित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि व्यापक जनहितासाठी हे पावसाळी अधिवेशन अत्यंत फलदायी (प्रॉडक्टिव्ह) ठरावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनापूर्वी साधलेल्या संवादात पुढे असेही नमूद केले की, भारत सध्या ’रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ (सुधारणा, अंमलबजावणी आणि परिवर्तन) या एक्सप्रेसवर स्वार होऊन वेगाने प्रगती करत आहे. पावसाळा असो वा संसदेचे अधिवेशन, हे दोन्ही जर ’प्रोक्टिव्ह’ (सक्रिय) असतील तर ते अधिक ’प्रॉडक्टिव्ह’ (फलदायी) ठरतात, असा विचार त्यांनी मांडला. जेव्हा मान्सून आणि संसदेचे कामकाज दोन्हीही फलदायी ठरतात, तेव्हा देशाचे आणि पर्यायाने प्रत्येक सामान्य नागरिकाचे मोठे कल्याण होते, असे सांगत यंदाचा मान्सूनही देशभरात चांगला राहो, अशी सदिच्छा व प्रार्थना पंतप्रधानांनी याप्रसंगी व्यक्त केली.
The country’s growth rate stood at 7.7 percent during the global crisis.