समृद्धी महामार्गावर दरोड्याचा प्रयत्न; चालकाला कोयत्याचा धाक

रस्त्यावर दगड ठेवून कार थांबवली

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर वाहनचालकाला लक्ष्य करत दरोड्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे रामनगर-पाटोळे शिवारात घडली. रस्त्यावर दगड ठेवून कारचे टायर फुटविण्यात आले. त्यानंतर चालकाला कोयते व दांडक्यांचा धाक दाखवत पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत अशोक कर्‍हाळे (28, रा. संभाजीनगर) हे रविवारी (दि. 19) पहाटे होंडा सिटी (क्र. एमएच 12 आयएन 7140) कारने संभाजीनगरहून मुंबईकडे जात होते. समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 575.4 जवळ रस्त्यावर ठेवलेल्या दगडावरून कार गेल्याने टायर फुटले. त्यामुळे त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले.
यावेळी जगदीश सखाराम शिरधार, बबलू उर्फ सोपान मंडले, नितीन मारुती गोफणे, चेतन अंकुश गोफणे, रवींद्र त्र्यंबक बंडकर हे हातात कोयते व दांडे घेऊन आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यांनी पैशांची मागणी करत शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलिस अधिकारी कांतीलाल पाटील व पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Attempted robbery on Samruddhi Mahamarg; driver threatened with a sickle.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *