– राजेश शिरभाते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे ताब्यात घेतल्यापासून भाजपाने शिवसेना संपवण्याची आपली जुनी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलली. त्याचाच परिपाक म्हणजे आता शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले सहा खासदार खुष्कीच्या मार्गाने भाजपात प्रवेश करते झाले आहेत. शिवसेना संपवण्याचे हे राजकारण काही आताचे नव्हे. ते फार जुने आहे. काँग्रेसला शिवसेना संपवण्याची जितकी गरज वाटली नाही तितकी गरज भाजपाला त्यांच्या स्थापनेपासून वाटत आलेली आहे. काही शिवसैनिकांना या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभवही आलेला असेल. त्यावेळी त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्याकडे अमर्याद सत्ता नव्हती. आता त्यांच्याकडे सर्व काही आहे. ते जसे म्हणतात तसे होत आहे. त्यामुळे आपले हे शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्याची त्यांना घाई आहे. महाराष्ट्रातील जी जनता आता शिवसेना संपल्याचा आनंद व्यक्त करत आहे. त्यातील मराठी माणसांची येणारी पिढी हा इतिहास वाचेल तेव्हा मराठी माणसांची किव करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही राहिलेले नसेल.
भाजपा हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक भाग आहे. या संघात स्वयंसेवक असतात. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण देऊन चांगले नागरिक घडवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तरुण वयाच्या ऊर्जेचा आणि त्याला लागणार्या प्रोत्साहनाचा विचार करून ही संस्था आदर्शवत काम करत असते. ती भाजपासारख्या पक्षाला वैचारिक पाठबळ देते, योजना देते, त्या पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करते. अशा प्रकारची यंत्रणा इतर कोणत्याही पक्षाकडे नाही. ती या देशात केवळ एकाच पक्षाकडे होती, ती म्हणजे शिवसैनिकांकडे. शिवसैनिक ही एक आगळी जमात आहे. ती भले प्रशिक्षित नसेल, ती फार वैचारिक नसेल. शब्दांचे फुलारे, राजकारणाचे डावपेच त्यांना येत नसतील तरीही त्यांच्याकडे निष्ठा आहे. हो शिवसेनेतील बाहेरून केवळ पदासाठी आलेली मंडळी गेली तरी या शिवसैनिकांची निष्ठा कायम आहे. आजही हिंगोलीत किंवा इतर ठिकाणी सामान्य शिवसैनिकांनी जी आंदोलने केली ती याचीच साक्ष आहे. संघ स्वयंसेवकांपेक्षा शिवसैनिक वेगळा आहे. तो उत्स्फूर्त आहे. तुमच्या विभागात एखादे संकट येऊद्यात इतर कोणीही तिथे जाणार नाहीत, मात्र शिवसैनिक पहिल्यांदा पोहोचेल. कोणाला रुग्णालयात घेऊन जायचे असेल, कोणाला संरक्षण द्यायचे असेल इथपासून ते नवरा-बायकोची भांडणेही सोडवण्यात शिवसैनिक हिरिरीने पुढाकार घेतो. हा शिवसैनिक अनेकांच्या डोळ्यात खुपतो. जिथे इतर लोकांचे स्वयंसेवक सभा घेऊन आपल्या नेत्याच्या आदेशाची वाट पाहत असतात तोपर्यंत शिवसैनिक आपले काम पूर्णही करत असतो. तो बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबीयांवर
स्वतःच्या कुटुंबीयांप्रमाणे प्रेम करतो. त्याची राजकीय समज कमी असेल, पण ‘मातोश्री’वरून उमेदवार आला की त्याला जिंकवणे हे आपले हे काम आहे, या पद्धतीने तो ते पूर्ण करतो. तेलगू देसम पक्षाला आंध्र प्रदेशात सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसला पर्याय म्हणून प्रादेशिक पक्ष पुढे आले. त्यानंतर शिवसेनेनेही राजकीय पक्ष म्हणून आपले काम केले. त्या आधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा त्यांना अनुभव होता. मोरारजींनी 106 जणांचे खून केले तरीही ते मागे हटले नाहीत. मोरारजींना मुंबई गुजरातला न देण्याचा राग होता. नेहरूंमुळे व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे त्यांना ते करावे लागले. त्याचा राग नंतर त्यांनी मृत्यूनंतर आपली सर्व संपत्ती गुजरातला दान देऊन काढला.
हा शिवसैनिक नामोहरम करावा, प्रादेशिक पक्षाच्या ऐवजी आपला पक्ष वाढवावा, अशी भाजपाची भूमिका होती. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला पर्याय असावा, अशी गरज आणीबाणीनंतर सुरू झाली होती. महाराष्ट्रात भाजपाला पाय रोवायचा होता. त्याचबरोबर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आपले स्थानही बळकट करायचे होते. त्यात मोठी अडचण ही शिवसेनेची होती. शिवसेना ही एक प्रखर आणि उघडउघड हिंदुत्ववादी संघटना होती. त्यांची मुंबईत सत्ता होती. महाराष्ट्रातील तेव्हाच्या तरुणांनाही ती आकर्षिक करत होती. शिवसेनेचा विरोध करून आपले काम भागणार नाही हे भाजपाने ओळखले होते. त्यामुळे त्यांची नेहमीची यशस्वी खेळी त्यांनी खेळली. आधी मित्र म्हणून घरात घुसायचे आणि नंतर योग्य वेळ आल्यावर घात करायचा, या विचाराने भाजपाने शिवसेनेबरोबर मैत्री केली. शिवसेनेला तेव्हा फार फार तर महानगरपालिका निवडणुका लढण्याचा अनुभव होता. त्यांना विधानसभा व इतर निवडणुकांसाठीची रणनीती शिकवण्याच्या बहाण्याने भाजपाने शिवसेनेचा विश्वास मिळवला. मला आठवते, 1995 मध्ये जेव्हा युतीची सत्ता आली तेव्हाही भाजपा आपल्या जागा शिवसेनेपेक्षा अधिक याव्यात व आपला मुख्यमंत्री व्हावा, यासाठी देव पाण्यात टाकून बसले होते. त्यानंतर त्यांनी किमान आपल्या जवळचा असावा म्हणून मनोहर जोशींना मुख्यमंत्री करावे, यासाठी गळ घातली. अर्थात, तेव्हाच्या गोष्टींना आतासारखा व्हिडिओचा पुरावा नव्हता. त्यानंतर ही मैत्री कशीबशी टिकवण्यात आली. महाराष्ट्रात आता आपल्याला सत्ता मिळायला हवी व ती शिवसेनेच्या मदतीशिवाय मिळायला हवी, असे विचार नंतरच्या काळात सुरू झाले व त्यानंतर उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद नाकारून त्यांना बाजूला करण्यात आले. तोपर्यंत भाजपाने शिवसेनेतील सर्व कच्चे दुवे हेरले होते. त्यांचा अभ्यास केला होता. त्यावर उपाय काढले होते. भाजपाला केवळ शिवसेनेचा फायदा उचलणारी व पक्षाशी निष्ठा नसणारी माणसे हवी होती. ती मिळाल्याबरोबर त्यांनी आपली यंत्रणा लावून शिवसेना फोडली. पक्षाचे चिन्ह व नावही फुटलेल्या गटाला दिले व आता शिवसेनेत कोणीही राहणार नाही अशी स्थिती आणली आहे. भाजपा ही लढाई जिंकली असली तरी अद्याप रस्त्यावरचा जो खरा शिवसैनिक आहे तो काही अद्याप त्यांच्या हाती लागलेला नाही. महाराष्ट्र धर्म बुडण्याची जर नियतीचीच इच्छा असली तरीही ते काही तितके सोपे नाही.
शिवसेनेतील इतर जणांचे फुटणे व आताचे फुटणे यात जमीन अस्मानचा फरक आहे. अगदी शिंदे गेले तेव्हाची स्थिती व आताची स्थिती यातहीफरक आहे. शिवसेनेतून नारायण राणे हे बाहेर पडले होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रिपद भोगलेले होते. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्ष वाढीसाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांची बाळासाहेबांवरची निष्ठा वादातीत होती. ते स्वतः मोठे नेते होते. त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबरचे मतभेद जाहीर करत दिवसाउजेडी शिवसेना सोडली होती. तो कोणत्या पक्षात जाणार हे आधी ठरलेले नव्हते. त्यांना कोणाची फूस नव्हती. त्यांना सरकारी यंत्रणांचे पाठबळ नव्हते. ती एक व्यक्तिगत लढाई होती. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांचे स्वतःचे अस्तित्व होते, त्यांची माणसे होती. स्वतःचा पक्ष चालवण्याची त्यांची धमक होती. ती त्यांनी पूर्ण करुन दाखवली. इतिहासाच्या दृष्टीने आपण उद्धव ठाकरे यांच्या बरोबर उभे राहिले पाहिजे हे ओळखून ते पुन्हा एकत्रही आले. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा भाजपाने त्यांना पूर्ण पाठबळ दिले होते. मुख्यमंत्रीपद दिले. जे वास्तविक उद्धव ठाकरे आपल्याला देतील असे त्यांना वाटत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाले. या सार्याच्या रागापोटी त्यांनी भाजपाला पूर्ण साथ दिली. त्यांच्या बरोबर गेलेले आमदार हे शिवसैनिकांच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. त्यांना परत निवडून आले नाही तरी चालेल इतकी त्यांची सोय झाल्यामुळे ते गेले. हे सहा खासदार मात्र अशा स्थितीत निवडून आले होते की ज्यावेळी भाजपा काहीसा गाफील होता. यांना शिवसेनेशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी लोकांच्या भावनांचा खेळ केला. संजय दीना पाटील हे खासदार तर किरीट सोमैय्या यांच्यावरील शिवसैनिकांच्या रागाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेले होते. आता त्यांना त्याच किरीट सोमय्या यांच्या पायाशी जावे लागले आहे. ओम निंबाळकर जी लंगडी कारणे सांगत आहेत किंवा एका खासदाराने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून पक्ष सोडल्याचे म्हटले आहे त्यावर लोक आता हसतही नाहीत. त्यांनी विचार करायला हवा की, उद्धव ठाकरे यांची संपर्क यंत्रणा इतकी मजबूत आहे की त्यांना त्या खासदाराच्या हालचालींचा आधीच अंदाज आला होता. त्यामुळेच त्यांना त्याला अनुल्लेखाने मारले होते. असो, सर्वसामान्य जनता आणि राजकारणाचे अभ्यासक या सार्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहू शकतात. आज भाजपा आपल्या योजनेत यशस्वी झाली आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे चांगली यंत्रणा आणि आयोग असेल त्यात या सहाही जणांना ते पुन्हा निवडून आणतील कदाचित. शिवसेनेचे एक पाऊल राजकारणात मागे गेले आहे. मात्र, शिवसेनेत जे आहेत ते आता निष्ठावान आहेत यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. कदाचित न जाणे शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षासारखी उभी राहिल. राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. शिवसेनेची सध्याची स्थिती एका हिंदी चित्रपटातल्या संवादासारखी झाली आहे. त्याचा मराठी अर्थ असा आहे की आता इतके वाईट झाले आहे की, आता यापुढे केवळ चांगले होणेच शिल्लक आहे.
The desire to finish off the Shiv Sena is an old one.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik